‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
By संतोष कनमुसे | Updated: December 26, 2025 08:53 IST2025-12-26T08:26:10+5:302025-12-26T08:53:08+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणी मोठा दावा केला आहे. यामुळे चव्हाण चर्चेत आले आहेत, त्यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळातील किस्से सांगितले आहेत.

‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी अमेरिकेतील 'जेफ्री एपस्टीन' प्रकरणी मोठे दावे केले होते. यामुळे मागील काही दिवसांपासून चव्हाण चर्चेत आहेत. तसेच त्यांच्या मुख्यमंत्री काळातील साधेपणामुळेही ते चर्चेत असतात. चव्हाण यांची 'टीओडी मराठी' या युट्यूब चॅनेलने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री काळातील अनुभव आणि किस्से सांगितले आहेत. मुख्यमंत्री काळात त्यांची मुलांनी कधीही राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मुलांच्या राजकारणाबाबत प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले, मी माझ्या मुलाला आधीच सांगितलं आहे, तुला जे हवे ते कर. पण राजकारण करायचे असेल तर सुरुवातीपासूनच केले पाहिजे, अचानक माझा मुलगा म्हणून करायला चालणार नाही. माझ्या मुख्यमंत्री काळात असताना तु इकडे काही व्यवसाय करायचा नाही असे सांगितले होते. त्यानेही ते लगेच ऐकले. त्याने माझ्या पदाचा कधीही गैरवापर केला नाही. मुलगा मला वर्षा बंगल्यावर भेटायला यायचा तेव्हा तो टॅक्सीने यायचा, वर्षावरचे पोलिस त्याची टॅक्सी अडवायचे, ही आठवण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितली.
"एकदा त्याने ऊर्जा खात्याकडे अजित पवार यांच्याकडे बैठकीला गेला होता. मला त्यावेळी ही गोष्ट समजली. त्यावेळी मी त्याला इकडे सांगितले होते की इकडे काही काम करायचं नाही . त्यानेही माझे ऐकले. त्याचे दिल्लीतच जास्त वास्तव्य राहिले आहे. त्यांच्या काय महत्वकांक्षा होत्या, त्या काळात मला त्यांच्याकडे लक्ष देता आले नाही, असंही चव्हाण म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुले राजकारणापासून दूर
पृथ्वीराज चव्हाण यांची दोन्ही मुले राजकारणापासून दूर आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव जयसिंह असे आहे. जयसिंह यांनी पुण्यातील एमआयटी येथून इंजिनिअरींग केले आहे.