अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती?
By यदू जोशी | Updated: January 8, 2026 06:28 IST2026-01-08T06:26:54+5:302026-01-08T06:28:27+5:30
भाजपसोबत ताण असून दोरी तुटत नाही व काकांसोबत जवळीक असूनही पूर्ण विलीन होत नाही, अशा अवस्थेत अजितदादा सध्या आहेत. भाजपशिवायच नाही तर भाजपविरुद्धही आपण जिंकू शकतो, हे सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष करत आहेत.

अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती?
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपसोबत जाण्यासाठी अजितदादांनी २०२३ मध्ये काकांची साथ सोडली आणि आज दोन महापालिकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी तीनच वर्षांनंतर त्यांनी काकांचे बोट धरले आहे.
भाजपसोबतचे दादांचे संबंध आज ताणले गेल्याचे दिसत आहे; पण तुटेपर्यंत दोघेही ताणतील असे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष भाजपविरुद्ध अजित पवार ताकदीने उतरले आहेत. पुतण्याला काकांची जोडी लाभली आहे. पालिकेची ही निवडणूक नातेसंबंधांच्या पातळीवर वेगळाच अनुभव देत आहे.
मुंबईत दोन भाऊ एकत्र आले, पुण्यात काका-पुतण्याची जोडी जमली. ठाकरे काय अन् पवार काय, या निवडणुकीपुरते एकत्र आले ते पुढे एकत्र राहतीलच याची शाश्वती नाही. ठाकरेबंधूंचे ‘साथ-साथ’ राहणे हे पालिकेतील संख्याबळावर अवलंबून असेल. पवारांचे पुढेही सोबत राहणे हे तीन-चार मुद्यांवर अवलंबून राहील. अजितदादांनी पवार यांच्यासोबत पालिकेत जाण्यावर भाजपने आक्षेप घेतला नाही, हे स्पष्टच आहे.
भाजपची मूकसंमती?
‘काकांसोबत जायचे असेल तर सरकारमधून आधी बाहेर पडा’ अशी कोणतीही निर्वाणीची भाषा भाजपने केली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, निवडणुकीपुरते काका-पुतण्यांची जोडी व्हावी याला भाजपची मूकसंमती आहे. आज तरी दिसत नाही.
विचारधारेपेक्षाही सत्ता हातात असणे हा मोठा व्यवहारधर्म
या निवडणुकीकडे बघण्याचा अजित पवार यांचा दृष्टिकोन मर्यादित आहे. त्यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड हवे आहे. जसे नागपूर फडणवीसांचे, ठाणे शिंदेंचे तसे पुणे, पिंपरी-चिंचवड माझे असे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड आहे. अनेक अर्थांनी समृद्ध अशा या दोन महापालिकांमध्ये सत्ता असण्याचे महत्त्व काय, ते अजितदादा जाणतात. कारण ते पवार आहेत. विचारधारेपेक्षाही सत्ता हातात असणे हा मोठा व्यवहारधर्म असतो.
राजकारणात नातेसंबंध हे भावनेपेक्षा गरजेवर टिकतात, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. काल जे अपरिहार्य होते ते आज गैरसोयीचे ठरते आणि आज जे तडजोड म्हणून स्वीकारले जाते ते उद्या धोरण म्हणून मिरवले जाते. राजकारणात शत्रू कायमचे नसतात, तसेच मित्रही कायमचे नसतात, सत्ता हे अंतिम सत्य असते. भाजपसोबत ताण असून दोरी तुटत नाही व काकांसोबत जवळीक असूनही पूर्ण विलीन होत नाही, अशा अवस्थेत अजितदादा सध्या आहेत.
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करत आहे; पण ही दोरी नेमकी कोणाच्या हातात आहे, हे निकालच ठरवतील. विधानसभेत भाजपच्या मदतीने ते जिंकले होते, आता भाजपशिवायच नाही तर भाजपविरुद्धही आपण जिंकू शकतो, हे सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष ते करत आहेत.