Mumbai Rain: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी साधला संवाद; मुंबईतील स्थितीचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 22:54 IST2020-08-05T22:52:54+5:302020-08-05T22:54:20+5:30
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

Mumbai Rain: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी साधला संवाद; मुंबईतील स्थितीचा घेतला आढावा
मुंबई – शहरात गेल्या १२ तासात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईत पूरस्थिती उद्धभवली आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचं चित्र आहे, रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईची रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला, मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे, या संकटात केंद्र सरकार शक्य तितकी मदत करण्यास तयार आहे असं मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
PM @narendramodi spoke to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray regarding the situation prevailing in Mumbai and surrounding areas due to heavy rainfall. PM assured all possible support. @OfficeofUT
— PMO India (@PMOIndia) August 5, 2020
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३०९ मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या 'डी' विभाग परिसरात नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सर्वाधिक वेग नोंदविण्यात आला. मरीन लाईन्स परिसरात दरताशी तब्बल १०१.४ किलोमीटर एवढा वाऱ्यांचा कमाल वेग सायंकाळी ४:१५ च्या सुमारास नोंदविण्यात आला. आजच्या अतिवृष्टीच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार - कर्मचारी - अधिकारी अव्याहतपणे कार्यरत होते.
आजच्या अतिवृष्टीच्या काळात बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा तातडीने व्हावा, यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच सुसज्ज व कार्यतत्पर ठेवण्यात आले होते. या व्यवस्थेचा आवश्यकतेनुसार व वेळोवेळी वापर करण्यात आला. अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या देण्यात आलेल्या सूचनांनुसार त्या तुकड्या देखील कार्यतत्पर व सुसज्ज होत्या.