मुलुंड विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या गडावर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 03:08 AM2019-08-14T03:08:36+5:302019-08-14T03:09:06+5:30

मुलुंड विभागातील आमदारकीचे प्रबळ दावेदार समजले जाणारे कोटक खासदार बनल्याने भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ सुरू आहे.

Mulund Assembly Constituency: BJP corporators, office bearers contest | मुलुंड विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या गडावर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची चढाओढ

मुलुंड विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या गडावर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची चढाओढ

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे
मुंबई : गेल्या दोन दशकांपासून भाजपचा गड असलेल्या मुलुंडमधून लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा गुजराती मतदार मनोज कोटक यांच्या बाजूने उतरला होता. त्यात विद्यमान आमदार वयोवृद्ध झाले आहेत. या विभागातील आमदारकीचे प्रबळ दावेदार समजले जाणारे कोटक खासदार बनल्याने भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत चढाओढ सुरू आहे. भाजपकडून कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई पूर्वेकडील प्रवेशद्वार असलेल्या मुलुंड मतदारसंघामध्ये उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी संमिश्र वस्ती आहे. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी चेहरेपट्टी मुलुंडला आहे. पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगरपासून पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंड विस्तारले आहे.

लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व मुंबईतील या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजेच ६३.६६ टक्के मतदान झाले. यात कोटक यांना सव्वा लाखापेक्षा अधिक मतदान झाले. मोदी लाटेपेक्षाही हे मतदान अधिक होते. गुजराती, व्यापारी वर्गाचा पाठिंबा त्यांना मिळाला.

मुलुंड विधानसभा क्षेत्रात १९९९ पासून भाजपचे आमदार सरदार तारासिंग कार्यरत आहेत. पालिका निवडणुकीत भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एका नगरसेविकेचे पद जात प्रमाणपत्रातील त्रुटीमुळे रद्द करण्यात आले होते. त्या जागी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळाली.

यंदाही तारासिंग यांनी उमेदवारीसाठी तयारी केली आहे. कामही सुरू आहे. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असल्याने अनेकांच्या भुवया उंचावतात़ त्यात मुख्यमंत्र्यांनीच ग्रीन सिग्नल दिल्यामुळे यंदाही मुलुंडमधून आपणच निवडणूक लढविणार असल्याचे तारासिंग यांचे म्हणणे आहे.

तारासिंग यांचे वय झाले असल्याने, त्यांच्याऐवजी नवीन चेह-याला संधी मिळावी म्हणून पदाधिकाºयांमध्ये धुसफुस सुरू आहे. आमदारकीचे प्रबळ दावेदार कोटक खासदार झाल्याने, नगरसेवक, पदाधिकारी आमदारकीच्या तयारीला लागले आहेत. मुलुंडमधून भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे, पदाधिकारी विनोद कांबळे, पी.एस. नागराजन तसेच युवानेते विरल शहा यांनी उमेदवारीसाठी धडपड सुरू केली आहे. नागराजन यांनी तर कार्यालयही घेतले असून, लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे.

तारासिंग मात्र कोणीही आले तरी आपणच निवडणूक लढविणार यावर ठाम आहेत. काँग्रेसमधून चरणसिंग सप्रा पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. तर वंचितच्या उमेदवाराचा शोध अजूनही सुरू आहे. मनसेचे चित्रच स्पष्ट नसल्याने त्यांचे उमेदवार पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून
आहेत. (उद्याच्या अंकात वाचा - घाटकोपर)
 

Web Title: Mulund Assembly Constituency: BJP corporators, office bearers contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.