राज्यात एक लाखाहून अधिक विद्यार्थी झाले 'ड्रॉप आऊट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:33 IST2025-10-30T10:33:35+5:302025-10-30T10:33:48+5:30
दहावीनंतर इतर कोर्सेसकडे कल : शिक्षण विभाग

राज्यात एक लाखाहून अधिक विद्यार्थी झाले 'ड्रॉप आऊट'
मुंबई : राज्यातील युडायस प्रणालीतील विद्यार्थ्यांची संचमान्यता आणि नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तरीही १ लाख १० हजार २४४ विद्यार्थी गळती असल्याची आकडेवारी शिक्षण विभागातील प्राथमिक परिषदेच्या ताज्या माहितीतून समोर आली. यामध्ये मुंबई जिल्हा प्रथम, तर पालघर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निक आदीकडे वळतात, त्यामुळे ते ड्रॉप आऊटमध्ये गणले जातात. यु-डायस सांख्यिकी प्रणालीसाठी संचमान्यता, विद्यार्थी नोंदणीसंदर्भात ३० सप्टेंबर ही तारीख होती. शिक्षक संघटनांच्या मागणीवरून २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र अर्ध्यावर शाळा सोडतात त्याना ड्रॉप आऊटमध्ये गणले जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उच्च माध्यमिक स्तरावर विविध कारणामुळे विद्यार्थी शाळा सोडतात. त्यामुळे त्या शैक्षणिक स्तरात ही गळती असू शकते. प्राथमिक स्तरावर मात्र गळती नाही. विजय कोंबे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती
विद्यार्थी अर्ध्यावरच शाळा सोडतात. त्यांना ड्रॉप आऊट म्हणतात. याचे कारण आपल्या विषम समाजरचनेत आहे. विद्यार्थी पूर्ण शिक्षण घेईल याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. अद्याप नोंदणी पूर्ण झालेली नाही. डॉ. माधव सूर्यवंशी, समन्वयक, शिक्षण विकास मंच
काही विद्यार्थी १० वी नंतर आयटीआय, पॉलिटेक्निक आणि इतर कोर्ससाठी जातात. त्यामुळे ते ११ वी प्रवेशात नसल्याने ड्रॉप बॉक्समध्ये दिसतात. डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक शिक्षण संचालनालय
असंघटित कामगारांच्या पालकांची मुले एका जिल्ह्यातून किंवा या राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. त्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू असते. परंतु अशा गळती झालेल्या बालकांचा पुन्हा शोथ घेऊन त्यांना शाळेत आणले जाते. संजय यादव, संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद