"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:20 IST2025-11-21T11:16:06+5:302025-11-21T11:20:23+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. मनसे स्वतंत्र पक्ष आहे असं विधान देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता काँग्रेसने मनसेला विरोध करत स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. मात्र काँग्रेसने सबुरीने घ्यावे असं सांगत उद्धवसेनेने काँग्रेसशी संपर्क साधला आहे. मनसे आणि मविआ एकत्र यावी असा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दात मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. आमचा स्वतंत्र पक्ष असून आमचे निर्णय राज ठाकरे योग्य वेळी घेतील असं सांगितले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. मनसे स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाचा निर्णय राज ठाकरे घेत असतात. त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धव ठाकरे काय बोलतात, ते दोघे एकमेकांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड शरद पवारांशी काय बोलतात याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमचा निर्णय राज ठाकरे योग्य वेळी करतील असं त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळिमा फासणारी निवडणूक आहे. दादागिरी करून, पैशाचे आमिष दाखवून सत्ताधारी पक्ष निवडणुका लढत आहे. सत्ताधारी पक्षातच एकमेकांशी भांडणे सुरू आहेत. लोकांच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. केवळ नाराजीच्या बातम्या येतायेत. आम्ही काल महापालिकेचा भ्रष्टाचार उघडकीस आणला त्यावर कुणी बोलत नाही. एकनाथ शिंदे नाराज अशा बातम्या येतात. त्यात लोकांचे प्रश्न कुठे आहेत असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला.
दरम्यान, कल्याण लोकल प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. कुठल्याही तरुणाने आत्महत्या करणे योग्य नाही. आम्ही त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढू. या मारहाणीत कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मराठी मुलाला झालेल्या मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही. आम्ही त्या मुलाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कल्याण लोकल मारहाण प्रकरणावर भाष्य केले आहे.