Join us

मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 14:57 IST

MNS BJP News: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना बळ मिळत असून, दुसरीकडे भाजपा आणि मनसेतील दुरावा वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

MNS BJP News: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली साद चर्चेचा विषय ठरली. यानंतर दोन भाऊ एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. यातच मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भाजपाने नाकारल्याचे समजते. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेने ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना या प्रतिसभागृहासाठी आमंत्रित केल्याने भाजपा नेते नाराज झाले असून, यामुळे प्रतिसभागृहात सहभागी होण्यास नकार दिल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय टाळीची चर्चा सुरू असतानाच, भाजपाने मनसेचे निमंत्रण नाकारल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. 

मनसेकडून आदित्य ठाकरेंना निमंत्रण, भाजपाचा सहभागास नकार

मागील काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने पालिकेचे सभागृहाच भरलेले नाही. त्यामुळे लोकांच्या अनेक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने मनसेने महापालिकेच्या धर्तीवर प्रतिसभागृह आयोजित करण्याची घोषणा केली होती. या प्रतिसभेसाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. यात आदित्य ठाकरे, भाजपाचे आशिष शेलार, समाजवादी पक्षाचे रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राखी जाधव, मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, मनसेचे हे आमंत्रण भाजपाने नाकारले आहे. राज्यात एकीकडे ठाकरे गट आणि मनसेच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच, भाजपाने मनसेचे आमंत्रण नाकारल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

भाजपाने आपल्या पत्रात काय म्हटले आहे?

आपले निमंत्रण आम्हाला मिळाले. निमंत्रणाबाबत आभार! ज्या ठाकरे गटाने गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला, ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे; त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबाबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल? असा स्वाभाविक प्रश्न आमच्या पक्षांतर्गत चर्चेअंती उपस्थित झाला. मुंबईकरांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मुंबईचे मंत्री महोदय, आमदार, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व आम्ही सर्व भाजपा नगरसेवक सातत्याने रस्त्यावर उतरून सातत्याने प्रयत्नशील आहोतच. मुंबईतील रस्त्यांच्या दर्जाबाबत आणि कामात होणाऱ्या विलंबाबाबत भाजपा आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाची प्रदीर्घ बैठक घेऊन ३१ मे २०२५ पूर्वी चालू कामे पूर्ण करण्याचे सकारात्मक निर्देश दिलेले आहेत. दरवर्षी प्रशासनाच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याची प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व भाजपाचे लोकप्रतिनिधी करत आहेत. आशिष शेलार, पालकमंत्री मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, सह पालकमंत्री हे आरोग्य, कचरा व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, महापालिका विविध प्रकल्प याबाबत वेळोवेळी आढावा बैठका घेत आहेत. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिका प्रतिसभागृहात २५ वर्षे पराकोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यासोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा भाजपा रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी प्रमाणेच सातत्याने अग्रेसर व कटिबद्ध राहील. पुनश्च एकदा आपल्या निमंत्रणाबद्दल आभार!

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासंदीप देशपांडेशिवसेनाआदित्य ठाकरेआदित्य ठाकरेभाजपाआशीष शेलार