ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 00:00 IST2026-01-05T23:57:20+5:302026-01-06T00:00:26+5:30
मंत्री नितेश राणे आणि स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
मुंबई - महापालिका निवडणुकीची रणधुमाळी मुंबईत सुरू आहे. त्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या निवडणुकीत उद्धवसेना-मनसे युतीमुळे अनेक जागांवरील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली. त्यात वार्ड क्रमांक १९४ वरून मोठा वाद झाला होता. या जागेसाठी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी इच्छुक होते. परंतु ही जागा उद्धवसेनेला सोडण्यात आली. तिथे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातच संतोष धुरी नाराज असल्याची बातमी समोर आली होती. आता नाराज संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री नितेश राणे आणि स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्याची अधिकृत माहिती नाही. परंतु धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भाजपात प्रवेश करतील असं बोलले जात आहे.
कोण आहेत संतोष धुरी?
संतोष धुरी हे राज ठाकरेंच्या मनसेचे माजी नगरसेवक होते. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांची घट्ट मैत्री आहे. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी सक्रीय होते. मागील मनपा निवडणुकीत ते मनसेकडून निवडणूक लढले होते. परंतु त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी ठाकरे बंधू युती होत आहे. त्यात वार्ड क्रमांक १९४ मधून संतोष धुरी निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यात संदीप देशपांडे यांनीही धुरी यांच्या तिकीटासाठी प्रयत्न केला. मात्र जागावाटपात ही जागा उद्धवसेनेला सुटली. त्यामुळे देशपांडे आणि धुरी नाराज असल्याची बातमी पुढे आली होती.
त्यानंतर संदीप देशपांडे मनसेच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटताना दिसले. राज ठाकरे यांच्या मेळाव्यात संतोष धुरी यांनी हजेरी लावली होती. परंतु धुरी यांनी नाराजी कमी झाली नाही. अखेर त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यामुळेच धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून लवकरच त्यांचा अधिकृतपणे भाजपात प्रवेश होईल असं सांगितले जाते.