Join us

आम्ही सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 16:17 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात भूकंप केला. अजित पवारांसहछगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार अजित पवारांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत. 

दरम्यान, मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांसह छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी भुजबळ यांनी सांगितले की, आम्ही सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत. आम्ही पक्ष फोडला असे काही लोक सांगतात पण ते बरोबर नाही. आम्ही इथे राष्ट्रवादी म्हणून आलो आहोत. आम्ही मोदी सरकारवर अनेकदा टीका देखील केली आहे. त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे हे खरे आहे.

केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशपातळीवर मोदींना समर्थन कण्यासाठी हा निर्णय झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच विकासाला महत्त्व दिले पाहिजे असे मत माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे झाले. त्यातच, गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचे काम केले, ज्याप्रमाणे विकासाचे काम केलंय, ते पाहता त्यांच्यासोबत जायला हवे, असे आमचे मत आहे. देशाच्या राजकारणात आज सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. त्यामुळेच, ही राजकीय परिस्थिती पाहता, आम्ही मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झालो आहे. यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :छगन भुजबळअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामंत्रीमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष