Join us

मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 05:55 IST

कार्यालयातून सुटून घरी निघालेल्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. मेट्रो स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. 

लोकमत न्युज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या रोड शोचा फटका वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. मोदी यांच्या सुरक्षिततेचे कारण देऊन मेट्रो १ मार्गिकेवरील जागृतीनगर ते घाटकोपर ही सेवा बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच बंद करण्यात आली. त्यातून कार्यालयातून सुटून घरी निघालेल्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. परिणामी, मेट्रो स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रचारासाठी मोदी यांचे दौरे होत आहेत.  एलबीएस मार्गावर घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व असा मोदी यांचा रोड शो बुधवारी आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव या रोड शोसाठी जागृतीनगर ते घाटकोपर ही मेट्रोसेवा बंद ठेवण्याची सूचना मुंबई मेट्रो वन प्रा.लि. (एमएमओपीएल) केली होती. त्यातून सायंकाळी ६ वाजल्यापासून  या स्थानकांदरम्यान मेट्रोसेवा बंद ठेवण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला. 

पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रोसेवा बंद ठेवण्यात येणार आहे, असे एमएमओपीएलने जाहीर केले. मात्र, या रोड शोमुळे प्रवासी मात्र वेठीस धरले गेले, तसेच मेट्रोची पूर्ण सेवा चालविण्यावर बंधने लागू केल्याने वर्सोवा ते जागृतीनगर मार्गावरही मेट्रो गाड्या १० ते १५ मिनिटांच्या अंतराने धावत होत्या. 

 

टॅग्स :मुंबईमेट्रोनरेंद्र मोदीमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४भाजपामहायुती