अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:30 PM2024-01-22T18:30:15+5:302024-01-22T18:31:41+5:30

अयोध्या मंदिर सोहळ्यातील व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोविंदगिरी महाराजांनीही भाषण केले.

Mention of Shivaji Maharaj in Ayodhya Ram mandir ceremony; Rohit Pawar said, this is wrong of govindgiri maharaj | अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर, प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिराचे लोकार्पण झाले. मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आज आपले राम आले आहेत असे म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. देशभरातून दिग्गजांची मांदियाळी अयोध्या नगरीत पोहोचली होती. आपल्या भाषणानंतर मोदींनी सर्वांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. मोदींच्या भाषणापूर्वी गोविंदगिरी महाराजांनीही व्यासपीठावरुन भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यावरुन, आमदार रोहित पवारांनी गोविंदगिरी महाराजांनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची विनंती केली आहे. 

अयोध्या मंदिर सोहळ्यातील व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोविंदगिरी महाराजांनीही भाषण केले. यावेली, महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या निर्धाराचा उल्लेख केला. तसेच, श्रीशैलम येथील त्यांच्याशी निगडीत इतिहासही सांगितला. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन गोविंद महाराजांनी आपलं विधान मागे घ्यावं अशी विनंती केली आहे. 

सन्माननीय महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल, असं वक्तव्य जाणं योग्य नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले 


रोहित पवार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती!, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करुन गोविंदगिरी महाराजांच्या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे. 

काय म्हणाले होते गोविंदगिरी महाराज

गोविंदगिरी महाराज म्हणाले, ''तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण, त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले. 

आज मला समर्थ रामदासांची आठवण झाली, त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले होते की, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, असे म्हणत गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. मात्र, रोहित पवार यांनी गोविंदगिरी महाराजांनी चुकीचा इतिहास सांगितल्याचं म्हटलं आहे.  
 

Web Title: Mention of Shivaji Maharaj in Ayodhya Ram mandir ceremony; Rohit Pawar said, this is wrong of govindgiri maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.