पहिल्याच पालिका महासभेत महापौरांना ४ मिनिटे उशीर..! दोन्ही सेना भिडल्या, मुलुंड दुर्घटनेवर चर्चा झालीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 06:22 IST2026-02-17T06:21:23+5:302026-02-17T06:22:16+5:30
२२७ नगरसेवकांना सभागृहात कुठल्याही अडथळ्याशिवाय बसता यावे यासाठी सभागृहात अधिकच्या खुर्च्या आणि बाकांवर आकडे लिहून आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.

पहिल्याच पालिका महासभेत महापौरांना ४ मिनिटे उशीर..! दोन्ही सेना भिडल्या, मुलुंड दुर्घटनेवर चर्चा झालीच नाही
मुंबई : जवळपास ३ वर्षे ११ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी पालिकेची पहिली महासभा सोमवारी भरली. या महासभेत स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट समितीवरील सदस्यांसह, सर्वपक्षीय गटनेते, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्यांची अधिकृत घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. १ तास ३१ मिनिटे चाललेल्या या सभागृहाची बैठकीची वेळ अडीच वाजताची असताना महापौरांना ४ मिनिटे उशीर झाल्याने सभेची सुरुवातच विरोधकांनी गोंधळाने केली.
महापौर शिस्तीचे पालन करणार नसतील तर नव्या नगरसेवकांना शिस्त कशी लागेल, असा जाब यावेळी विचारण्यात आला. शेवटी मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी २ मिनिटे सभागृहात शांतता पाळत कोणतेही कामकाज न करता सभागृह स्थगित करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला. दरम्यान, यावर मुलुंड दुर्घटनेवरील चर्चा ठरवून गुंडाळल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी करून नाराजी व्यक्त केली.
पहिल्या बाकावर कोण बसणार
पालिका सभागृहात २४ फेब्रुवारीनंतर सर्व नगरसेवकांसाठी जागेचे व्यवस्थापन करण्यात येणार असून तूर्तास सर्वच गट नेत्यांना पहिल्या बाकावर जागा मिळालेली नाही. आवश्यक मोठे बदल हे १५ मे ते १५ जून या दरम्यान होऊ शकतात. त्यामुळे तूर्तास पालिकेने त्यामुळे कोण कुठे बसणार यावरून सोमवारी ही गोंधळ पाहण्यास मिळाला.
बाकांवर आकडे लिहून आसन व्यवस्थेचे नियोजन
२२७ नगरसेवकांना सभागृहात कुठल्याही अडथळ्याशिवाय बसता यावे यासाठी सभागृहात अधिकच्या खुर्च्या आणि बाकांवर आकडे लिहून आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.
२ वाजून ३४ मिनिटांनी सभागृहाची पहिली घंटा वाजली आणि ‘वंदे मातरम्’ने सभागृहाची सुरुवात झाली. त्यानंतर सभागृहातील अपुऱ्या जागेबाबत निवेदन देत सर्व गटनेत्यांसोबतच्या बैठकीत रितू तावडे यांनी सभागृहाला माहिती दिली.
पुतळ्यांची पुनर्रचना
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना धक्का न लावता सभागृहातील इतर मान्यवरांच्या पुतळ्यांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी पालिका प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून, लवकरच ३३७ म्हणजेच २२७ नागरसेवक आणि १० स्वीकृत नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी आसन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महापौर तावडे यांनी लागलीच सर्व पक्षांच्या अधिकृत गटनेत्यांच्या नावांची घोषणा सभागृहात केली.