Maratha Morcha Uddhav Thackeray: मुंबईमध्ये मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण सुरू झाले. आझाद मैदानात मराठा आरक्षण समर्थक मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले. इतर दहा जणांना भूमिका विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोलताना आणि प्रश्न सोडवा, असे ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"मी सांगतोय की, पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. ज्यांनी ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते. ते लोक आता कुठे आहेत? आता गावी पळाले आहेत. आता नुसती दर्शनं घेत आहेत. एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यावर त्यांना सामोरं जा. नुसतं घरोघरी काय फिरत आहात?", असा टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
मराठा आरक्षणाच्या मागणीबद्दल आता तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्नही ठाकरेंना विचारला गेला. ते म्हणाले, "माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये. माझं म्हणणं मी तेव्हा मांडलं आहे. मी अंतरवाली सराटीमध्ये गेलो होतो, तेव्हा मनोज जरांगेंच्या समोर उभं राहून बोललो होतो."
"आता माझं मत असं आहे की, त्यांनी हा प्रश्न हाताळला पाहिजे. त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि आंदोलक थेट बोला ना", असे उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले.
जरांगे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का? असं जेव्हा ठाकरेंना विचारण्यात आलं. ते म्हणाले, "हा शेवटी जरांगे पाटलांचा विषय आहे. त्यांना कुणाकडून काही अनुभव आले असतील, तर ते त्याप्रमाणे बोलत असतील. पण, काही जरी झालं; ज्यांचं ते आता कौतुक करत आहेत. त्यांनी (शिंदे) सुद्धा त्यांना (जरांगे) फसवलंच आहे ना? अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, आता वर्षभर उपमुख्यमंत्री आहेत. का त्यांना न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे फक्त टोलवाटोलवी या सरकारकडून सुरू आहे", अशी टीकाही ठाकरेंनी केली.
आंदोलक दहशतवादी नाहीत -ठाकरे
आंदोलन चिघळण्याच्या शक्यतेचा मुद्दा जेव्हा उद्धव ठाकरेंकडे मांडला गेला, तेव्हा ते म्हणाले, "आंदोलक हे काही दहशतवादी नाहीत. ते मराठी माणसं आहेत. ते हक्काने विघ्नहर्त्याच्या उत्सवातच न्याय मागायला आले आहेत. त्यांना असं वाटतं असेल की, सरकार देऊ शकत नाही, तर विघ्नहर्त्या तूच आमच्यावरच संकट दूर कर", अशी भूमिका ठाकरेंनी मांडली.