मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:11 IST2024-12-07T15:09:32+5:302024-12-07T15:11:46+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर पलटवार करत खोचक शब्दांत समाचार घेतला आहे.

मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीवेळी आज विधानभवनात नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होताच महाविकास आघाडीच्या आमदारांनी अचानक सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. हे सरकार जनादेशाने आले नसून ईव्हीएम घोटाळ्याच्या जीवावर निवडून आलं आहे, असा हल्लाबोल करत मविआ आमदारांनी ही भूमिका घेतली. विरोधकांच्या या भूमिकेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार करत खोचक शब्दांत समाचार घेतला आहे.
"लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना त्यांनी काय वक्तव्य करायचं, हा त्यांचा अधिकार आहे. पण शपथ घेण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तरच परवा सभागृहामध्ये ते कामकाजात भाग घेऊ शकतात. ही प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हा त्यांचा केविलवाणा प्रकार सुरू आहे," अशा शब्दांत अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
ईव्हीएमवरून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर
महाविकास आघाडीकडून ईव्हीएम संदर्भात होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "मी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काम केलेले आहे. या निवडणुकीत ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. लोकसभेत ईव्हीएमने महाविकास आघाडीला ३१ जागा दिल्या. त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं. इकडं मात्र असा निकाल लागला त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. त्याला काही अर्थ नाही."
दरम्यान, आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याचं टाळणाऱ्या मविआ आमदारांकडून उद्या काय भूमिका घेण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.