Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी स्वतःहूनच सांगितलं, शिवसेना मंत्र्यांच्या खिशातल्या राजीनाम्यांचं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 19:14 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: गेली पाच वर्षं सातत्याने शिवसेना 'मोठ्या भावा'वर कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करत होती.

ठळक मुद्देशिवसेनेची सगळ्यात जास्त फिरकी कशावरून घेतली गेली असेल, तर ती 'खिशातल्या राजीनाम्यांवरून'. हे सरकार नोटिस पीरियडवर आहे, शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊनच फिरत आहेत, अशा गर्जना सेनेचे नेत करत होते.

गेल्या पाच वर्षांत नेटकऱ्यांनी शिवसेनेची सगळ्यात जास्त फिरकी कशावरून घेतली गेली असेल, तर ती 'खिशातल्या राजीनाम्यांवरून'. केंद्र आणि राज्यातील सत्तेत भाजपासोबत मांडीला मांडी लावून शिवसेना बसली होती, पण सातत्याने 'मोठ्या भावा'वर कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करत होती. भाजपाच्या खोड्या काढत, हे सरकार नोटिस पीरियडवर आहे, शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊनच फिरत आहेत, फक्त उद्धव ठाकरेंच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, अशा गर्जना सेनेचे नेते करत होते. पण, अपेक्षेप्रमाणे 'मातोश्री'चा आदेश काही आला नाही आणि हे राजीनामे शेवटपर्यंत खिशातच राहिले. आज उद्धव यांनी स्वतःच या राजीनाम्यांचा उल्लेख केला.    

महाराष्ट्रात पूर्ण बहुमत नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर, प्रगतीशील सरकार चालवून दाखवलं, महाराष्ट्राला नवी दिशा दिली. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार आणणं ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे, असे कौतुकोद्गार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नाशिकमधील विजय संकल्प मेळाव्यात काढले होते. वास्तविक, शिवसेनेच्या साथीनं भाजपाने बहुमताचा आकडा पार केला होता. तरीही, 'राज्यात बहुमताचं सरकार नव्हतं' असं मोदींनी म्हटल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. युतीसाठी प्रयत्नशील असलेल्या शिवसेनेला हा सूचक इशारा तर नाही ना, अशी चर्चाही सुरू झाली होती.  

त्याबद्दलच आज पत्रकारांनी उद्धव यांना विचारलं असता, त्यांनी अगदीच सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. कुठल्याही नव्या वादाला तोंड फुटू नये, याची काळजी घेऊन ते म्हणाले की, पक्ष म्हणून नरेंद्र मोदींचा मुद्दा बरोबर आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. पण, शिवसेनेनं त्यांना गेल्या पाच वर्षांत दगा दिलेला नाही. आता तुम्ही म्हणाल, ते राजीनाम्याचं काय झालं. तर, सुरुवातीला तो एक काळ होता, पण नंतर आमच्या नेत्यांनी तशी भाषा वापरलेली नाही. प्रत्येक विकासकामांत शिवसेनेचा सहभाग राहिला. आम्ही सरकारला पाठिंबा दिलाच, सोबत विकासालाही दिला, असं उद्धव यांनी नमूद केलं. 

खिशातील राजीनामे या विषयावरून शिवसेना अनेकदा ट्रोल झाली होती. त्यावरून कित्येक जोक व्हायरल झाले होते. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळात ते पुन्हा चर्चेत येऊ नयेत आणि शिवसेना चेष्टेचा विषय ठरू नये, म्हणूनच बहुधा उद्धव यांनीच त्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असावा.

आजच्या ठळक राजकीय बातम्या

नरेंद्र मोदींनी राम मंदिरावरून 'बाण' मारला, उद्धव ठाकरेंचा सूरच बदलला!

उद्धव ठाकरेंची हळूच 'पलटी'; म्हणे, ठरलाच नव्हता फॉर्म्युला 'फिफ्टी-फिफ्टी'

'इंजिना'ची दिशा ठरेना; राज ठाकरे EVMविरोधात, पण मनसैनिकांना लढवायचीय निवडणूक!

मराठी तरुणाईला उद्योजकतेचे धडे देणारे नामदेवराव 'वंचित बहुजन आघाडीत'

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू'

सुवर्ण त्रिकोणात राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालेल?

   

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपानरेंद्र मोदी