Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचं 'ते' ट्विट शिवसेना नेत्याकडून रिट्विट; भाजपाला शह देण्याची 'मातोश्री'ची खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:32 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - सूडबुद्धीनं कारवाई करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला चिमटा काढला होता.

मुंबई - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ईडीची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारांवर झालेल्या ईडी गुन्ह्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधात निदर्शने करत आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माथाडी मेळाव्यात बोलताना अप्रत्यक्षरित्या या प्रकरणावर भाष्य केलं होतं. 

सूडबुद्धीनं कारवाई करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला चिमटा काढला होता. त्यानंतर ईडीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पवारांनी मी महात्मा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानाबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी तपासाला सहकार्य करणार. पण एक सांगतो, हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही असं भाष्य केलं होतं. शरद पवारांच्या ट्विटरवरुन हे वाक्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रिट्विट केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेने शरद पवारांची पाठराखण करण्याची ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही पवारांवर भाजपाने केलेल्या टीकेवर शिवसेनेनं भाष्य केलं होतं. भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत भाजपा अध्यक्ष अमित शहा सोलापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांनी 50 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रासाठी काय केलं? असा सवाल विचारला होता. त्यावेळीही शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून अमित शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला होता. महाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवारांचे योगदान आहे. हे कोणी नाकारु शकत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली होती. 

दरम्यान, शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल झालेत. 100 कोटींपेक्षा जास्त घोटाळा असल्याने ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही विधानसभा निवडणुकीत 100 टक्के महायुतीच जिंकणार आहे. त्यामुळे असे सुडाचे राजकारण आम्ही करत नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र काही जागांवर अद्यापही दोन्ही पक्षांचे एकमत होत नसल्याने युतीचं घोडं अडलं असल्याचं बोललं जातंय. 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम असणाऱ्या शिवसेनेला 120 पेक्षा अधिक जागा सोडण्यासाठी भाजपा तयार नाही. त्यामुळे कुठेतरी युतीत जागा वाढवून घेण्यासाठी शिवसेना दबावतंत्राचा वापर करतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.  

महत्वाच्या बातम्या 

निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा 

गोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी

भाजपा-सेनेचे अनेक इच्छुक कुंपणावर; युती झाल्यास थेट मनसेच्या 'इंजिना'वर...फोनाफोनी सुरू 

'पवारांवरील कारवाई सूडबुद्धीने नसून उशिराच', तक्रारदार जाधव म्हणतात... 

एकनाथ खडसेंकडून युतीचे संकेत, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून माहिती

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपाट्विटरअंमलबजावणी संचालनालय