महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटरवर पाजळले कायद्याचे अज्ञान!;उत्साहाच्या भरात दंड विधानाचा चुकीचा संदर्भ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 01:37 AM2019-09-12T01:37:28+5:302019-09-12T01:37:45+5:30

दरोड्याच्या गुन्ह्यासाठी सात वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा होत असल्याची दिली माहिती

Maharashtra police ignore law on Twitter! | महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटरवर पाजळले कायद्याचे अज्ञान!;उत्साहाच्या भरात दंड विधानाचा चुकीचा संदर्भ

महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटरवर पाजळले कायद्याचे अज्ञान!;उत्साहाच्या भरात दंड विधानाचा चुकीचा संदर्भ

Next

मुंबई : फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘दि स्काय इज पिंक’ या आगामी चित्रपटातील एका संवादावरून ‘भारतीय दंड विधानाच्या कलम ३९३ अन्वये दरोड्याच्या गुन्ह्यासाठी सात वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा’ असल्याची जाणीव करून देणारे ट्विट करून महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी त्यांचे कायद्याचे अगाध अज्ञान जगजाहीर केले.

या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रीलीज झाला व तो सिनेरसिकांना पसंतही पडला. तसेच पोलिसांच्या या टिष्ट्वटचेही अनेकांनी कौतुक केले. अर्थात समाजमाध्यमांवर वावरणाऱ्यांनी केलेले टिष्ट्वट बरोबर आहे की चूक याचा विचार करणे अपेक्षितही नसल्याने त्यांचे कौतुक अनाठायी असले तरी समजण्यासारखे आहे. पण अतिउत्साही पोलीस खात्याला मात्र फौजदारी कायद्याची शिकवणी देण्याची गरज यामुळे प्रकर्षाने पुढे आली.

‘दि स्काय इज पिंक’ या चित्रपटात झायरा वसिम ही फरहान व प्रियांकाची मुलगी - आयशा दाखविली आहे. ती आजारी असते व तेव्हाचा एक संवाद या ट्रेलरमध्ये आहे. त्यात प्रियांका फरहानला म्हणते, ‘एक बार आयशी ठीक हो जाए ना, फिर साथ मे बँक लुटेंगे.’ या संवादावरून पोलिसांनी भादंवि कलम ३९३ चा संदर्भ देऊन सात वर्षांच्या शिक्षेची जाणीव करून दिली. वास्तविक, चित्रपटाचे कथानक पाहता मुलीच्या औषधोपचारासाठी पैसे नसलेल्या अगतिकतेतून मातेच्या तोंडून बाहेर पडलेले हे उद््गार आहेत. पण पोलिसांच्या खाकी नजरेने त्यातही गुन्हेगारी शोधली आहे!

दंड विधानातील ३९३ हे कलम जबरी चोरीच्या प्रयत्नासाठी शिक्षेचे कलम आहे. फरहान व प्रियांका यांच्या संवादावरून त्यांनी बँक लुटण्याची योजना आखली, एवढेच स्पष्ट होते. यासाठी कलम ३९३ सर्वस्वी गैरलागू आहे. कारण हे कलम लागू होण्यासाठी जबरी चोरीचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी संभाव्य चोरट्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी जाणे व चोरीचा यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न करणे अभिप्रेत आहे. हा गुन्हा फक्त त्याच टप्प्याला लागू होतो. त्याआधीची गुन्ह्यासाठीची पूर्वतयारी आहे, त्यासाठी दंड विधानात स्वतंत्र गुन्हा आहे.
दुसरे असे की, दंड विधानात जबरी चोरी व दरोडा असे दोन स्वतंत्र गुन्हे (कलम ३९०, ३९१) आहेत. ज्याला लुटले जाते त्याला चोरट्यांनी डांबून ठेवले, जबर मारहाण केली किंवा जीव घेण्याची धमकी दिली तरच ती चोरी ‘जबरी चोरी’ या वर्गात मोडते. साधी चोरी आणि जबरी चोरी यात असा फरक आहे. ‘दरोडा’ हीदेखील हिंसाचारासह केलेली जबरी चोरीच असली तरी त्यात पाच किंवा अधिक गुन्हेगार सहभागी असतील तर ती ‘जबरी चोरी’ ‘दरोडा’ होते.

सूतावरून स्वर्ग गाठला
फरहान व प्रियांका यांच्या संवादातील या केवळ एका वाक्यावरून पोलिसांनी सूतावरून स्वर्ग गाठला आहे. कारण या वाक्यावरून बँक लुटायला किती जण जाणार आहेत किंवा प्रत्यक्ष लुटमारीच्या वेळी हिंसाचार झाला का, हे काहीच स्पष्ट होत नाही. पण पुढील सर्व गोष्टी गृहीत धरून जणूकाही फरहान व प्रियांका यांनी जबरी चोरी किंवा तसा प्रयत्न केला आहे अशा आविर्भावात पोलिसांनी त्यांना सात वर्षांच्या संभाव्य शिक्षेची धमकीही देऊन टाकली आहे.

Web Title: Maharashtra police ignore law on Twitter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.