शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 08:36 AM2024-06-09T08:36:00+5:302024-06-09T08:36:53+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: उत्तर मध्य मतदारसंघात भाजप उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. एकावेळी ५० हजारांपुढे आघाडी असलेल्या ॲड. निकम यांना अखेरच्या मतमोजणीच्या टप्प्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Maharashtra Lok Sabha Election 2024: BJP's vote margin decreased in Shelar's constituency, Adv. Ujjwal Nikam was hit | शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका

शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका

 मुंबई -  उत्तर मध्य मतदारसंघात भाजप उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. एकावेळी ५० हजारांपुढे आघाडी असलेल्या ॲड. निकम यांना अखेरच्या मतमोजणीच्या टप्प्यात पराभवाचा सामना करावा लागला. याच मतदारसंघात येणाऱ्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार निवडून आले आहेत. मात्र याच मतदारसंघात ॲड. निकम यांना अवघी ३ हजार ६०६ इतकी कमी आघाडी मिळाली आणि गायकवाड यांची आघाडी मोडण्यात ते अपयशी ठरले. 

पुरेशी आघाडी न मिळाल्यामुळे आशिष शेलारांसह आणखी चार भाजप आमदार पक्ष श्रेष्ठींच्या रडारवर आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेलार हे २६,५०७ मतांनी विजयी झाले होते.

दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई या मतदारसंघात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे मुंबईची जबाबदारी ज्या आशिष शेलार यांच्या खांद्यावर आहे त्या मतदारसंघात निकम यांना मिळालेल्या अल्प आघाडीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी आघाडी मिळालीच मात्र अगदी लागून असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात वर्षा गायकवाड यांच्यापेक्षा २७ हजार मते कमी मिळाली आहेत. त्यामुळे नेमके भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा शेलार यांच्या खांद्यावर होती तिथे त्यांच्या आणि बाजूच्या मतदारसंघातही निकम यांना पुरेशी मते मिळालेली नाहीत.

शेलार राजीनामा देणार का? 
मुंबईतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून शेलार मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशीही चर्चा आहे. मंत्रिपद मिळण्याची दीर्घ प्रतीक्षा असलेल्या शेलार यांच्या कामगिरीमुळे त्यांना संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारातही स्थान मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: BJP's vote margin decreased in Shelar's constituency, Adv. Ujjwal Nikam was hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.