Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी''
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:20 IST2019-11-26T16:18:46+5:302019-11-26T16:20:18+5:30
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी''
मुंबईः अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमच्याकडे बहुमत नसल्याचं सांगत फडणवीसांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी आकडेमोड करण्यास सुरुवात केली होती. पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी तत्पूर्वीच राजीनामा दिल्यानं काँग्रेसनंही भाजपावर निशाणा साधला आहे. सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा भारतीय संविधान व लोकशाहीची ताकद कितीतरी मोठी आहे, हे आज संविधान दिनी सिद्ध झाल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा भारतीय संविधान व लोकशाहीची ताकद कितीतरी मोठी आहे, हे आज संविधान दिनी सिद्ध झालं.#सत्यमेव_जयते#ThanksDrAmbedkar#ConstitutionofIndia#ConstitutionDay#जयहो
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 26, 2019
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. जे लोक मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते ते अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नव्हता. शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर राज्यपालांकडे जाऊन आपलं हसं करून घेतलं, सत्तेसाठी सोनिया गांधी यांची लाचारी केली, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला होता. अजित पवारांनी फडणवीसांबरोबर सत्ता स्थापन केल्यापासून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती. त्याविरोधात महाविकास आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयानंही उद्या संध्याकाळपर्यंत बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं होतं. तत्पूर्वीच फडणवीस आणि अजितदादांनी राजीनामा दिल्यामुळे या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळालेला आहे. आता लवकरच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.