Maharashtra Government: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 13:04 IST2019-12-01T11:41:13+5:302019-12-01T13:04:43+5:30
सध्या विधानसभेत सरकारच्या बाजूने १६९ आमदारांचे पाठबळ आहे, तर उर्वरित आमदारांमध्ये १०५ भाजपाचे आमदार अन् इतर असे संख्याबळ आहे.

Maharashtra Government: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा
मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार आलेले आहे. १६९ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर ठाकरे सरकारने विधानसभेत शनिवारी बहुमत सिद्ध केलं. तर भाजपा आमदारांनी कामकाज नियमाला धरुन होत नाही असं सांगून सभात्याग केला होता.
BJP leader Devendra Fadnavis has been elected as Leader of Opposition of Maharashtra Assembly. (File pic) pic.twitter.com/Ajpf8e1Mjg
— ANI (@ANI) December 1, 2019
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०१४ ते २०१९ असा सलग ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा बहुमान माजी मुख्यमंत्री वसंतदादा नाईक यांच्यानंतर फडणवीसांना मिळाला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळातही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार अवघ्या ४ दिवसात कोसळलं. त्यामुळे अल्पकाळाचं सरकार म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आहे.
सध्या विधानसभेत सरकारच्या बाजूने १६९ आमदारांचे पाठबळ आहे, तर उर्वरित आमदारांमध्ये १०५ भाजपाचे आमदार अन् इतर असे संख्याबळ आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे. तत्पूर्वी विधानसभेत आज झालेल्या कामकाजात हंगामी विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांची निवड केली. विधानसभा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली.
सभागृहात मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष ठरले असताना विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु होती. शनिवारी आणि रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं पण विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषणेचा कार्यक्रम देण्यात आलेला नव्हता. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विरोधी पक्षनेत्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली. शनिवारी झालेल्या बहुमत चाचणीत ठाकरे सरकार यशस्वी झाले, महाविकास आघाडीत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आणि उर्वरित मित्र पक्षांच्या पाठिंब्यावरुन १६९ आकडा गाठता आला. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने आता विधानसभेत ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळणार आहे.