Join us

राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षणमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक, लवकरच निर्णय होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 21:15 IST

पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या दौनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. याचपाश्वभूमीवर ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाले असून राज्यातील महाविद्यालयांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे नियम पाळत सुरु करण्याची परवानगी दिली. यानंतर आता राज्यात सरसकट पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. 

पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठक घेतली. या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा आढावा घेतला. राज्यात शाळा सुरू होऊन ३ आठवडे झाले आहेत. या तीन आठवड्याचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू कराव्यात अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडली.

जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी लवकरच मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्सबरोबरही चर्चा करणार असल्याचे सांगितले. मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्ससोबत चर्चा झाल्यानंतर सरसकट शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. सध्या राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.

टॅग्स :शाळाउद्धव ठाकरेवर्षा गायकवाडमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारविद्यार्थी