Maharashtra Government: राष्ट्रवादीतील 'दादा'गिरी कायम; अजित पवारांचा मान अन् स्थान 'जैसे थे', आमदारांना दिले धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:11 IST2019-11-27T19:01:36+5:302019-11-27T19:11:12+5:30
Maharashtra News: जो पक्ष निर्णय घेईल ते मला मान्य आहे. आपण एक आहोत, शरद पवारांचं नेतृत्व अंतिम आहे

Maharashtra Government: राष्ट्रवादीतील 'दादा'गिरी कायम; अजित पवारांचा मान अन् स्थान 'जैसे थे', आमदारांना दिले धडे
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत आमदारांना धडे दिले, त्यामुळे बंड करुन माघारी परतलेल्या अजित पवारांचं पक्षातील स्थान तितकचं मजबूत असल्याचं या बैठकीच्या निमित्ताने दिसून आलं. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेते जयंत पाटील यांनी आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलविली होती. या बैठकीला अजित पवारांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली.
या बैठकीला मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, पुन्हा नव्या जोमाने आपण सगळेच कामाला लागू. मी नाराज नव्हतो. मी पक्षात आहे यापुढेही राहणार आहे. जो पक्ष निर्णय घेईल ते मला मान्य आहे. आपण एक आहोत, शरद पवारांचं नेतृत्व अंतिम आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महाराष्टभर वाढवायची आहे, सामान्य माणसांची सेवा सरकारच्या माध्यमातून करायची आहे असं दादांनी सांगितले तसेच मंत्रिपदाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं सांगितले.
Guided the newly elected MLA’s at the @NCPspeaks meeting held in Y. B. Chavan Centre today. pic.twitter.com/TYLxLDPDG4
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 27, 2019
राजकीय नाट्यमय घडामोडीत अजित पवारांनी केलेलं बंड चांगलंच गाजलं. भाजपाशी हातमिळवणी करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात आंदोलनं केली, अनेक ठिकाणी त्यांचे पुतळेदेखील जाळण्यात आले. तर कुटुंबाकडून अजित पवारांना पुन्हा परतण्याचे भावनिक आवाहनही करण्यात येत होतं. राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेत होते. अजित पवारांनी दरम्यानच्या काळात ट्विट करत मी राष्ट्रवादी आहे आणि शरद पवारच हे आमचे नेते आहे असं सांगून एकप्रकारे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं त्यावर शरद पवारांनीही गैरसमज पसरवू नका असं अजित पवारांना सांगितलं होतं.
मात्र अजित पवारांचं बंड थंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. त्यानंतर अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा सूपूर्द केल्याने भाजपा सरकार कोसळलं. मात्र या सर्व घटनांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले अजित पवार रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी पोहचले. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जवळपास 3 तास अजित पवार आणि शरद पवारांची बैठक संपली.