Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 19:11 IST

वर्क फ्रॉम होम मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहन

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलची भागीदारीराज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणारगुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

मुंबई - सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असतांना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली  उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकतांना महाराष्ट्राच्याशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट  फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय  यामुळे होणार आहे.

वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावे- मुख्यमंत्रीजे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की,  गुगल मुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबवितांना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.  ते म्हणाले की गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास  यामुळे मदत होईल.

टॅग्स :उद्धव ठाकरेगुगलशिक्षणविद्यार्थीमहाराष्ट्र