Maharashtra Government: मुख्यमंत्री म्हणून चुकलात पण विरोधी पक्षनेते म्हणून चुकू नका अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 07:54 AM2019-12-02T07:54:11+5:302019-12-02T07:55:01+5:30

भाजपाने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे व जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: Miss as Chief Minister but do not miss as Opposition Leader says Shiv Sena Warns Devendra Fadanvis | Maharashtra Government: मुख्यमंत्री म्हणून चुकलात पण विरोधी पक्षनेते म्हणून चुकू नका अन्यथा...

Maharashtra Government: मुख्यमंत्री म्हणून चुकलात पण विरोधी पक्षनेते म्हणून चुकू नका अन्यथा...

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी अशी आमची इच्छा आहे. खरं तर भाजपाचा हा अंतर्गत मामला आहे की, कुणाला विरोधी पक्षनेता करायचे किंवा कुणाला आणखी काय करायचे, पण राजस्थानात भाजपाचे सरकार आले नाही. तेथे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या काही विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीवर बसल्या नाहीत. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या भाजपा सरकारचा पराभव झाला. तेथेही बलाढय़ मानले गेलेले शिवराजसिंह चौहान हे विरोधी पक्षनेते बनले नाहीत व पक्षाच्या अन्य नेत्यांनी ते पद स्वीकारले. महाराष्ट्रात मात्र दिल्लीवाले ‘फडणवीस एके फडणवीस’ करीत आहेत यामागचे रहस्य नेमके काय ते समजून घ्यावे लागेल अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून फडणवीसांना टोला लगावला आहे.  

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बंड करून खासदारकीचा राजीनामा देणारे पहिले भाजपा क्रांतिवीर म्हणून नाना पटोले यांची नोंद आहे. विधानसभेत ते जिंकले व आता विधानसभेचे अध्यक्ष झाले. मोदी कुणाला बोलू देत नाहीत असे पटोले यांचे सांगणे होते. आता विधानसभेत फडणवीस यांनी बोलायचे की नाही हे नाना पटोले ठरवतील. विरोधी पक्षनेत्याने स्वतःची व पदाची प्रतिष्ठा राखली तर सर्व ठीक घडेल. आम्ही संसदीय लोकशाहीचा आदर करतो, तुम्हीही करा. हे सरकार पाच वर्षे टिकेल. हे सरकार कायदेशीर मार्गाने सत्तेवर आले आहे. 170 चा आकडा कायम राहील. विरोधी पक्षाने याचे भान ठेवावे, त्यातच त्यांचे हित आहे असा अप्रत्यक्ष इशाराही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सामनातून देण्यात आला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारचे बहुमत काठावरचे नाही, तर चांगले दणदणीत आहे. सरकारच्या बाजूने 170 आमदारांचे बळ आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतोच, पण फडणवीस यांच्या पाळीव पिलावळीच्या चष्म्यांतून आकडा 130 च्या वर जायला तयार नव्हता. 
  • विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री ‘टेकाडा’सारखा दिसतो तसेच हे बहुमताच्या बाबतीत झाले. 170 चा आकडा पाहून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने विधानसभेतून पळ काढला. 
  • शनिवारचा ‘170’ आकडा बहुधा भाजपवाल्यांच्या डोळय़ांत व डोक्यांत घुसल्याचा परिणाम असा झाला की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांना माघार घ्यावी लागली. आता पुढील पाच वर्षे त्यांना अशा माघारीची सवय ठेवावी लागेल. 
  • बहुमताच्या आसपासही जाता येणे शक्य नसताना दिल्लीने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली व ते सरकार कोसळल्यावर आता विरोधी पक्षनेतेपदीही पुन्हा फडणवीस यांनाच नेमले. वास्तविक महाराष्ट्राच्या जनतेला भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वातही बदल हवा होता व त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसले होते. 
  • विश्वासदर्शक ठरावाच्या प्रसंगी नवीन विरोधी पक्षनेत्यांनी जे ‘नाटय़’ केले ते काही बरोबर नव्हते. ‘मी नियम आणि कायद्याने वागणारा माणूस असल्याचे’ विनोदी विधान त्यांनी केले, पण त्यांनी विश्वासदर्शक ठरावादरम्यान जे मुद्दे उपस्थित केले, त्यास कोणत्या नियमांचा आधार होता? 
  • छत्रपती शिवरायांचे नाव मंत्र्यांनी शपथविधीत घेतले म्हणून फडणवीस यांचा जळफळाट झाला. शिवरायांचे स्मरण बेकायदेशीर ठरवणारे नियमांची भाषा करतात व 105 बाके त्यावर बडवली जातात. 
  • बहुमत नसताना महाराष्ट्राला अंधारात ठेवून बेकायदेशीर पद्धतीने शपथ घेणारे मुख्यमंत्री व विधानसभेला सामोरे न जाणारे 80 तासांचे मुख्यमंत्री अशी आपली इतिहासात आता नोंद झाली आहे हे लक्षात घ्या. ही नोंद पुसायची असेल तर विरोधी पक्षनेता म्हणून कायद्याने काम करा किंवा निदान खडसे मास्तरांची पक्षांतर्गत शिकवणी लावा.
  • भाजपाने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे व जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्या भोवती दिसत आहे, तो टिकवणे यापुढे अवघड जाईल असे वातावरण आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने पार पाडली असती तर आम्ही जे सांगतो त्यावर मोहोर उठली असती. 
  • 170 चे बहुमत साधे नाही व उद्या हा आकडा 185 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपाचे ‘कर्मफळ’ आहे. 
  • महाराष्ट्रावर जोरजबरदस्तीचे अघोरी प्रयोग चालले नाहीत. दिल्लीच्या जारण-मारण मंत्राचा प्रभाव पडला नाही. ‘बोलबच्चनगिरी’ सत्तेवर असताना लोकांनी खपवून घेतली. आता ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असे भाजपाने पोसलेले मीडियावालेच बजावत आहेत. 
     

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Miss as Chief Minister but do not miss as Opposition Leader says Shiv Sena Warns Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.