मुबईः महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या दिशेनं वेगवान हालचाली सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेसोबत जाण्यास हिरवा कंदील मिळाला आहे आणि आज हे नेते आपल्या निवडणूकपूर्व आघाडीतील मित्रांसोबत चर्चा करणार आहेत. त्यापैकी एक मित्र आहे, समाजवादी पार्टी. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा हा मित्र भाजपा-शिवसेना युतीचा कट्टर शत्रू मानला जातो. हिंदुत्ववादी विचारधारेला 'सपा'चे प्रमुख अबू आझमी कडाडून विरोध करत आलेत. आता त्यांचे मित्रच शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचं पाऊल टाकत असताना, त्यांनी या प्रयोगाचं समर्थन केलंय आणि त्यामागचं (राज)कारणही स्पष्ट केलंय.  

जनतेनं भाजपा आणि शिवसेनेला कौल दिला होता. परंतु, त्यांना सरकार बनवता आलं नाही. अशावेळी भाजपाला कमकुवत करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल, असं मत अबू आझमी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केलं. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून देश विनाशाकडे चालला आहे. हिंदू, मुस्लीम, मंदिर-मशीद, गाय-बैल यातच अडकला आहे. संधी मिळाली तर ते पुन्हा शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतात. त्यापेक्षा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं कधीही चांगलं. मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केल्याचं त्यांनी सांगितलं. भिवंडी महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याचं त्यांनी नमूद केलं.

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णयाचं स्वागत करतानाच, शिवसेनेला समरस व्हावं लागेल, असंही त्यांनी सूचित केलं. त्यात त्यांचा रोख हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे आहे. मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित काही विषय भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये मार्गी लागले नव्हते; त्यावर यावेळी निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली आहे. 


 
उद्धव ठाकरेंनाच पसंती!

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णयही दोन्ही काँग्रेसनी घेतला आहे. या पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला अबू आझमी यांनी पसंती दर्शवली आहे. उद्धव ठाकरे हे कमी आक्रमक आहेत. मुस्लिम आरक्षणाला त्यांचा प्रखर विरोध नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार व्हावं, अशी इच्छा आझमींनी व्यक्त केली. 

१५, १५, १३ चा प्रस्ताव!

महाराष्ट्रात शिवसेनेसह कशा प्रकारे सरकार स्थापन करावे, याबाबतचा फॉर्म्युला काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी तयार केला असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा होणार असून, त्यानंतर सरकार स्थापनेची तिघांतर्फे अधिकृत घोषणा होईल, असे समजते. शरद पवार मुंबईत परतताच रात्री उशिरा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पवार यांच्याशी निवासस्थानी सविस्तर चर्चा केली.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जो फॉर्म्युला तयार झाला आहे, त्यात दोन प्रस्ताव असून, ते शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहेत. एका फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी उपमुख्यमंत्रिपदासह अनुक्रमे १५ व १३ मंत्रिपदे येतील. दुसऱ्या प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी १४ मंत्री असा उल्लेख आहे.

तिन्ही पक्षांना समान मंत्रिपदाची मागणी शिवसेनेने मान्य न केल्यास महत्त्वाची खाती मिळावीत, असा या पक्षांचा आग्रह असेल. राष्ट्रवादीला गृह, अर्थ ही खाती हवी असून, महसूल व ग्रामीण विकास ही खाती आपल्याला मिळावीत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नगरविकास खाते शिवसेनेला देण्यास दोन्ही पक्षांची तयारी आहे. त्यामुळे समान मंत्रिपदे घ्यायची की काँग्रेस-राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती द्यायची, हा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

काँग्रेसने 'ती' चूक पुन्हा करू नये, शिवसेनेसोबत आघाडीस संजय निरुपम यांचा विरोध

शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला!

राज्याच्या त्रिभाजनाचा डाव; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ पण किती काळ?; भाजपचे कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता

संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Abu Azmi on alliance with Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.