Maharashtra Election 2019:'सत्तेत न येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे विरोधकांकडून आश्वासनांची खैरात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 14:02 IST2019-10-08T14:01:19+5:302019-10-08T14:02:53+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या शपथपत्र नामक जाहीरनाम्यात जनतेला प्रत्यक्षात पूर्ण करता येणार नाहीत अशी आश्वासने दिली आहेत.

Maharashtra Election 2019:'सत्तेत न येण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे विरोधकांकडून आश्वासनांची खैरात'
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत आपला विजय होणार नाही याची खात्री असल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात भरमसाठ आश्वासनांची खैरात केली आहे असा टोला भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी विरोधकांना लगावला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माधव भांडारी म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या शपथपत्र नामक जाहीरनाम्यात जनतेला प्रत्यक्षात पूर्ण करता येणार नाहीत अशी आश्वासने दिली आहेत. सत्तेत असताना 15 वर्षात जी कामे आघाडी सरकारला करता आली नाहीत तीच कामे पूर्ण करू अशा पद्धतीची आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. आपण सत्तेवरच येणार नसल्याची खात्री असल्याने आघाडीने अव्यवहार्य आश्वासने दिली आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या विकास योजनाही आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात मतदारांसमोर पुढे मांडल्या आहेत. मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून या भागासाठी वॉटरग्रीड राबविण्याची योजना फडणवीस सरकारने सुरूही केली आहे. आघाडीच्या जाहीरनाम्यात याच योजनेचा उल्लेख करण्यता आला आहे. यावरून राज्यात काय चालू आहे याची कल्पनाही आघाडीच्या नेत्यांना नाही असा टोला माधव भांडारींनी लगावला.
दरम्यान, काँग्रेस सरकारला आपल्या कार्यकाळात कृष्णा लवादाने आदेश दिलेले पाणीही अडवता आले नाही. लवादाच्या आदेशानुसार कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवण्याचे काम युती सरकारने केले. मात्र, हे अडवलेले पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी कालवे बांधण्याचे काम आघाडी सरकारला 15 वर्षाच्या काळात करता आले नाही. मुंबईमध्ये आघाडी सरकारच्या काळात केवळ एकच मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र, फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मुंबईसह पुणे, नागपूर या महानगरांमध्येही मेट्रोची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूलथापांना महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही असा दावा माधव भांडारींनी केला. सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांनी शपथनामा प्रकाशित करत बेरोजगारांना 5 हजार भत्ता तर किमान वेतन 21 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे.