Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM:..म्हणून भाजपाचा देशभरात विस्तार झाला; संजय राऊतांनी मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 08:26 IST

हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवून सत्ता स्थापना केल्यामुळेच आज भाजप देशभरात विस्तारला गेला

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठी महाविकासआघाडीचा बैठकींचा सिलसिला सुरुच होता. त्याचदरम्यान भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत सत्तेचा दावाही केला. मात्र या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये भाष्य केलं आहे. काँग्रेस ज्या संभ्रमावस्थेत अडकली त्या संभ्रमावस्थेत भाजप कधीच फसला नाही. एखाद्या राज्यात किंवा देशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने ‘तत्त्व’, ‘विचार’, भूमिकांना गुंडाळून ठेवले. त्यामुळेच आज देशभरात भाजपचा विस्तार झाला असं राऊतांनी सांगितले. 

तसेच भाजपाने ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती यांच्या पक्षाशी ‘युती’ करून सत्ता स्थापन केली आहे. हे सर्व पक्के सेक्युलर व हिंदुत्वाच्या विचारसरणीच्या विरोधात होते. रामविलास पासवान, नितीश कुमार हे कधीच हिंदुत्ववादी नव्हते. कश्मीरात मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पाकिस्तानधार्जिणा किंवा ‘स्वतंत्र कश्मीर’चा पुरस्कर्ता म्हणून बदनाम असतानाही भाजपने त्यांच्याशी युती केली आहे. ‘प्रसंगी हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवून सत्ता स्थापना केल्यामुळेच आज भाजप देशभरात विस्तारला गेला व ‘सेक्युलर’वादाचा अनर्थ केल्याने काँग्रेस आहे तो पाठिंबाही घालवून बसली असं संजय राऊत म्हणाले. 

सामनात संजय राऊतांनी मांडलेल्या रोखठोक भूमिकेचे मुद्दे 

  • ‘सेक्युलर’ ही विचारसरणी आहे, भूमिका नाही. धर्माच्या आधारावर निर्माण झालेली पाकिस्तानसारखी राष्ट्रे साफ रसातळाला गेली. हिंदुस्थानचे तसे झाले नाही. वीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते, पण धर्मांध नव्हते. 
  • बाळासाहेब ठाकरे हे शेंडी-जानव्याच्या हिंदुत्वाचे कठोर विरोधक होते. जन्मदाखल्यांवरील जात, धर्माचा रकानाच रद्द करा ही बाळासाहेबांची भूमिका. देश ‘निधर्मी’ आहे ना? मग न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून कसल्या शपथा घेता? भारतीय घटनेवर हात ठेवून शपथ घ्या! इतकी सरळ ‘सेक्युलर’ भूमिका घेणारे बाळासाहेबच होते. 
  • सेक्युलर काय व सेक्युलर कोण? या चक्कीत किती दळण दळायचे? भारतीय घटनेतला ‘सेक्युलर’वाद वेगळा तर काँग्रेससारख्या पक्षांनी स्वीकारलेला सेक्युलरवाद वेगळा. राममंदिर ही नव्वद टक्के लोकांची श्रद्धा असेल व त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मोहोर उठवली असेल तर त्यास विरोध करणे हा ‘सेक्युलरवाद’ नाही. 
  • शिवसेनेसारखा पक्ष हा प्रखर राष्ट्रवादी आहे; कारण तो देशातील सर्व विचारसरणीचा स्वीकार करतो. हिंदुत्व ही सगळय़ात मोठी विचारसरणी आहेच व त्यास ठोकरून कुणालाही पुढे जाता येत नाही. 
टॅग्स :संजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपाकाँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019