Maharashtra Budget Session 2023: आम्हाला चोर म्हणताय, चोरांचीच मतं घेऊन राज्यसभेत गेले; गुलाबराव पाटील राऊतांवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 13:14 IST2023-03-01T13:08:55+5:302023-03-01T13:14:40+5:30
Maharashtra Budget Session 2023: संजय राऊतांनी केलेल्या विधानावर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी सभागृहात भाषण करत निषेध व्यक्त केला.

Maharashtra Budget Session 2023: आम्हाला चोर म्हणताय, चोरांचीच मतं घेऊन राज्यसभेत गेले; गुलाबराव पाटील राऊतांवर संतापले
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झालं आणि आजचा दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळानं झालेली पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यानंतर संजय राऊतांवरील हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं आहे.
संजय राऊतांच्या या विधानावर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी सभागृहात भाषण करत निषेध व्यक्त केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधला. या सभागृहाला चोर म्हणायचं....४१ चोरांची मतं घ्यायची आणि राज्यसभेमध्ये जायचं. या चोरांनी त्याला मतं दिली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. मार्मिकमधूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच आक्षेपार्ह चित्र काढतात. कोणालाही डिवचायचा संजय राऊतांनी ठेका घेतलाय का?, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
आम्ही जनतेच्या मतांवर या सभागृहात निवडूण आलोय. तुमच्यासारखे मागच्या दरवाजाने निवडणून आलो नाहीय. शिवसेनेची यांनी तर वाट लावली आणि ते आता १६ आमदारांची देखील वाट लावणार आहेत. ज्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उल्लू बनवलं..३५-३५ वर्षे तपस्या करणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढलं. या माणसाने शिवसेनेचा सर्व सत्यानाश केला, तो माणूस आज आम्हाला चोर म्हणतोय. सभागृहाला चोर म्हणतोय. तुम्ही आमची मतं घेतलीय. तुम्हाला जर येवढी गणिमा राखायची असेल तर आता खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हान देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आशिष शेलार यांच्या मताशी सहमज असल्याचं म्हटलं. पण त्यांनी संजय राऊत यांचं थेट नाव घेणं टाळलं. जर एखादी व्यक्ती विधीमंडळाबाबत असं विधान करत असेल तर ते नक्कीच अशोभनीय आहे. पण त्यांनी खरंच असं विधान केलं आहे का? हेही तपासून पाहिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जावा. त्यांनी जर तसं विधान केलं असेल तर त्याविधानाशी आम्ही सहमत नाही, असं अजित पवार म्हणाले. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊतांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे.