Join us

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:14 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केला होता.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.  तिकीट वाटपापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये भाजपाने मोठा विरोध केला होता. मविआच्या सत्ताकाळात मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची राळ उठविली होती. दाऊदशी संबंध, मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. आता पुन्हा मलिक यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजपावर आली आहे. यामुळे निवडणुकीत याचा फटका बसण्याच्या शक्यतेने भाजप सावध पवित्रा घेत आहे. मलिक यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजप घेतली होती. तर दुसरीकडे महायुतीमधील नेते उपमुख्यमंत्री अजित पवार मलिक यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट

महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीला मोठा विरोध करण्यात आला होता. पण भाजपाचा विरोध झुगारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. यानंतर भाजपाने मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले, नवाब मलिक यांच्या प्रचाराला अजित पवार उपस्थित राहणार का नाहीत, या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या रोड शो साठी स्वत: अजित पवार यांची उपस्थिती आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आम्ही नवाब मलिक यांच्या पाठिमागे खंबीर असल्याचे सांगितले आहे.

नवाब मलिक यांच्या 'रोड शो' ला मोठी गर्दी झाली आहे. यावेळी बोलताना मलिक म्हणाले, अजित पवार यांच्या स्वागतासाठी लोक जमली आहेत. मला ज्या मोठ्या हिंमतीने उमेदवारी दिली. त्या हिंमतीला दाद देण्यासाठी लोक आली आहेत, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली. 

'आम्ही मलिक यांचा प्रचार करणार'

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नवाब मलिक यांचा प्रचार भाजपाने करणार नसल्याचा सवाल केला. यावेळी अजित पवार म्हणाले, मी माझी जबाबदारी पार पाडत असतो. आम्ही प्रचार करु, आम्ही सध्या प्रचार करत आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. अणुशक्तीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून विकास झालेला नाही. या मतदारसंघात मोठ्या समस्या आहेत. नवाब मलिक यांना संधी मिळाल्यानंतर आम्ही या मतदारसंघात काम करु , असंही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४निवडणूक 2024राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारनवाब मलिकदेवेंद्र फडणवीसभाजपा