Join us

आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिका ६ गटात, शिवसेनेच्या दोन्ही गटांना महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 20:16 IST

MLA Disqualification Hearing: ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देतोय. अशाने सुनावणी लांबत आहे. येथे एक भूमिका अन् सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका का घेता, अशी विचारणा राहुल नार्वेकरांनी केली.

MLA Disqualification Hearing: आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आता यापुढील सुनावणी २६ ऑक्टोबर होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ३४ याचिका ६ गटात विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या वकिलांनी पुन्हा एक नवा अर्ज केला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागण्यात आले आहेत. ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे. अर्जावर अर्ज येत आहेत. जर अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सर्वोच्च न्यायालयात याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. हे ट्रिब्यूनल अर्थात लवाद आहे. इथे प्रक्रिया आहे. इथे ट्रायल होते, असे सांगत राहुल नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

येथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता

दरवेळेस वेगवेगळ्या याचिका अर्ज दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, अशी विचारणा करत, जर मी सुनावणी घेत आहे, तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना दिल्याचे सांगितले जात आहे. सुनावणीदरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्रे ग्राह धरण्यात यावी, अशी मागणी केली, ती मागणी अध्यक्षांनी मान्य केली.  

दरम्यान, विधानसभा राहुल नार्वेकरांसमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये एकत्रित असे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण ३४ याचिका आहेत. यामध्ये १ ते १६ ठाकरे गटाच्या याचिका असतील. एकंदरीत ढोबळ वर्गवारी केली असल्याची माहिती वकिलांनी दिली. आम्ही कुठल्याही प्रकारे वेळ वाढवून घेत नाही. फक्त अर्ज दाखल केलाय. आम्हाला कागदपत्र रेकॉर्डवर आणयाचे आहेत, अशी माहिती ठाकरे गटाच्या वकिलांकडून देण्यात आली.  

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षविधानसभाराहुल नार्वेकरएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेआमदार