“मोदींना मजबूत करण्यासाठी एकत्र येऊ”; पीयूष गोयल मुंबईत, कार्यकर्त्यांशी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 06:42 IST2024-03-15T06:42:23+5:302024-03-15T06:42:37+5:30
गोपाळ शेट्टी ना टायर्ड आहेत ना रिटायर्ड आहेत. त्यांनी जे पक्षासाठी केले आहे, त्याच्या दहापट पक्ष त्यांच्यासाठी करेल, अशी ग्वाही पीयूष गोयल यांनी दिली.

“मोदींना मजबूत करण्यासाठी एकत्र येऊ”; पीयूष गोयल मुंबईत, कार्यकर्त्यांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपण सगळे मोदींच्या परिवारातून आहोत. मोदींना पुन्हा मजबूत करण्यासाठी आपण एकत्र येऊ, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारी घोषित झाल्यानंतर उत्तर मुंबई मतदारसंघाला दिलेल्या आपल्या पहिल्या भेटीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
कांदिवलीत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यासह उत्तर मुंबईतील भाजप आमदार, नगरसेवकांनी मंचावर उपस्थित राहून एकजुटीचे दर्शन घडवले.
मुंबई भाजप अध्यक्ष-आमदार आशिष शेलार यांनी यावेळी साडेपाच लाख मतांची आघाडी घेऊन गोयल याना निवडून आणावे, असे आवाहन केले. पीयूष गोयल यांचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. ते सच्चे मुंबईकर आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे बाहेरच्या उमेदवाराला येथून उमेदवारी देण्याच्या चर्चेत काही अर्थ नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले. गोपाळ शेट्टी ना टायर्ड आहेत ना रिटायर्ड आहेत. त्यांनी जे पक्षासाठी केले आहे, त्याच्या दहापट पक्ष त्यांच्यासाठी करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.