Join us  

Coronavirus: लोक ऐकत नाहीत, आता 'हाच' एकमेव उपाय; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 1:24 PM

नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही असं म्हटले आहे.

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे ,आरोग्य विभागातील तज्ज्ञ यांच्यासह राजकीय नेते मंडळी देखील नागरिकांना घरीच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे.  मात्र सरकारच्या आवाहनानंतरही राज्यभरात अनेक ठिकाणी नागरिक काम नसताना देखील घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 89 वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपा करून स्वतःला वाचवा, स्वतःच्या कुटुंबाला वाचवा, दिलेल्या आदेशांचे पालन करा. तसेच राज्य सरकारांनीही जनतेकडून नियमांचे पालन करवून घेतले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन  जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.  

coronavirus : लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत! मोदी संतप्त

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची अतिशय गांभीर्यानं नोंद घेऊन कृती करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा आदेश झालेला आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्त्यावर लोकांच्या घोळकेच्या घोळके बघायला मिळत आहेत. इतर देशातील परिस्थिती गंभीर झालेली आहे. त्याची गांभीर्यानं नोंद घेऊन वेळीच जी दक्षता घ्यायची आहे, ती त्यांनी घेतलेली आहे. आपणही अशा प्रकारची गांभीर्यानं दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

Coronavirus: कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच; शरद पवारांना विश्वास

दरम्यान, दरम्यान फिलिपिन्समधून आलेल्या प्रवाशाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा तिसरा बळी असून, देशात कोरोनानं दगावलेला हा आठवा रुग्ण आहे. गेल्या 24 तासांत 15 नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 14, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89वर पोहोचली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेजितेंद्र आव्हाडमहाराष्ट्रशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदी