कीर्तिकर-निरुपम यांच्यात वाढली चुरस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:23 IST2019-04-25T05:22:23+5:302019-04-25T05:23:31+5:30
मनसेची मते कुणाला? उत्तर भारतीयांच्या मतांवर दोन्ही पक्षांचा दावा

कीर्तिकर-निरुपम यांच्यात वाढली चुरस!
- मनोहर कुंभेजकर
युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासाठी सरुवातीला एकतर्फी वाटणारी उत्तर पश्चिम मुंबईतील निवडणूक काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या आक्रमक प्रचारामुळे अखेरच्या टप्प्यात चुरशीची बनली आहे.
मोदी लाटेत मागीलवेळी कीर्तिकर यांनी माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा १,८३,०२८ मतांनी पराभव केला होता. विजयाचा हाच सिलसिला कायम राखण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या भागातील ४२ पैकी ३७ नगरसेवक हे भाजप व शिवसेनेचे आहेत. ही कीर्तिकर यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे प्रचारातून दिसते.
दुसरीकडे संजय निरुपम यांच्यासाठी ही लढाई अस्तित्वाची आहे. त्यांनी हा मतदारसंघ हट्टाने मागून घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून ऐन निवडणुकांच्या काळात त्यांची उचलबांगडी झाली. मात्र त्यामुळे एकाच मतदारसंघाची जबाबदारी हाती असल्याने निरुपम यांनी जोरदार मुसंडी मारली. २८ वर्षे त्यांचे या मतदारसंघात वास्तव्य असल्याने या लढतीत निरुपम यांच्या राजकीय कौशल्याचा कस पणाला लागला आहे. गेला काही काळ त्यांनी ठरवून या मतदारसंघाची बांधणी केली आहे. मात्र त्यांच्या प्रचारात गुरूदास कामत व कृपाशंकर सिंग यांचा गट दिसत नाही. सोबत आले, त्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन निरुपम काम करताना दिसतात.
भाजपशी युती झाल्याने गुजराती-मारवाडी समाजाची मते युतीलाच मिळतील, असा शिवसेनेचा दावा आहे; तर उत्तर भारतीयांचे प्रश्न सुरूवातीपासून मांडल्याने तो समुदाय माझ्यासोबत असल्याचा दावा निरूपम करतात, पण मोदी लाटेपाासून ही मते भाजपकडे वळल्याचा त्या पक्षाचा दावा आहे. सध्या उत्तर प्रदेश, बिहारमधील मतदानाचे विविध टप्पे सुरू असल्याने हा मतदार बाहेरगावी आहे. त्यामुळे त्यांच्या मतांचा थांग लागलेला नाही. त्यामुळे निरुपम यांची मदार अल्पसंख्याक मतदारांवरही आहे. समाजवादी पक्षातर्फे सुभाष पासी हेही या मतदारसंघातून रिंगणात असल्याने मतविभाजनाची शक्यता आहे.
मनसे या वेळी निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यातच त्यांचे आणि निरुपम यांचे विळ्या- भोपळ्याचे नाते आहे. निरुपम यांच्या प्रचारात मनसे उतरणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०१४ साली मनसेला पडलेली ६६ हजारांवर मराठी मते नेमकी कोणत्या पक्षाकडे वळणार हा कुतुहलाचा मुद्दा आहे.
खासदार म्हणून केलेल्या कामगिरीच्या जोरावर व महायुतीच्या पाठबळामुळे येथील मतदार पूर्वीपेक्षा जास्त मतांनी पुन्हा लोकसभेत पाठवतील असा माझा ठाम विश्वास आहे.
- गजानन कीर्तिकर, शिवसेना
गेल्या पाच वर्षात कीर्तिकर हे ना दिल्लीत दिसले ना गल्लीत. मोदी लाटेत जनतेला खोटी आश्वासने देऊन ते निवडून आले. येथील जनता मोदींच्या हिटलरशाहीला कंटाळली आहे. त्याचा परिणाम दिसेलच.
- संजय निरुपम, काँग्रेस
कळीचे मुद्दे
रेल्वे, रस्ते यांसारख्ये मुंबईच्या सर्वच भागात जाणवणारे प्रश्न झोपड्यांचा पुनर्विकास हा येथील संवेदनशील मुद्दा आहे.
एआरएच्या रखडलेल्या, रेंगाळलेल्या योजनांचे दुखणे येथेही कायम आहे.