मराठी मुलांसाठी उत्तम संधी, भाषांतर क्षेत्रालाही हवे कुशल मनुष्यबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 12:21 PM2018-02-27T12:21:44+5:302018-02-27T12:21:44+5:30

येत्या काळात स्थानिक भाषांतरकारांची गरज प्रचंड भासणार आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या स्थानिकीकरणावर भर देत आहेत.

Job opportunities in Translation field for Marathi youth | मराठी मुलांसाठी उत्तम संधी, भाषांतर क्षेत्रालाही हवे कुशल मनुष्यबळ

मराठी मुलांसाठी उत्तम संधी, भाषांतर क्षेत्रालाही हवे कुशल मनुष्यबळ

googlenewsNext

मुंबई: पूर्वी भाषांतर म्हणजे पुस्तकांचे भाषांतर हे एकमेव क्षेत्र परिचित होते. पण अलीकडच्या काळात भाषांतराची गरज अनेक क्षेत्रांना भासू लागली. सध्या तर जवळपास प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांना आपल्या ग्राहकांशी (त्याचप्रमाणे संबंधित घटकांशी) संवाद (छापील, दृक्‌श्राव्य माध्यमातून) साधण्यासाठी स्थानिक भाषेची आवश्यकता भासत आहे. प्रसिद्धी पत्रके आणि जाहिरातींपासून ते ई-लर्निंग मोड्यूल्स, आयव्हीआर (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स), फेसबुकसाठी लागणारा मजकूर अशा अनेक माध्यमांमध्ये भाषांतरीत मजकुराची आवश्यकता भासते. पण सध्या एकूणच प्रसारमाध्यमांमध्ये येणारा भाषांतरीत मजकुराचा दर्जा पाहता या क्षेत्रालाही कुशल मनुष्यबळाची गरज आहे, असे चित्र दिसून येते.

काही दिवसांपूर्वी बंगाली भाषेतील एका अग्रणी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर एका मोबाईल कंपनीची जाहिरात छापून आली. त्यात प्रचंड चुका होत्या. ते वाचून बंगाली वाचक खवळला. त्याने मोबाईल कंपनीला धारेवर धरले. ट्विटरवर या निष्काळजीपणाबद्दल प्रचंड टीका झाली. अखेर मोबाईल कंपनीला लेखी माफीनामा द्यावा लागला. मराठी जाहिरातींचीही काही वेगळी परिस्थिती नाही

भाषांतर हे 'टार्गेट ऑडियन्स' (वाचक, श्रोता) लक्षात घेऊन करावे लागते हे मान्य. परंतु केवळ वाचक वा प्रेक्षक समजून घेतात म्हणून भाषेच्या मूळ वाक्यरचनेला फाटा दिला जातो, चुकीचे शब्द वापरले जातात. कंपन्यांकडूनही फार काटेकोरपणे याची दखल घेतली जात नाही. कारण, मुळात चूक झाली आहे हेच बहुधा कळत नाही आणि ती चूक दाखवून देण्याचे काम दर वेळी होतेच असे नाही. दुसरे म्हणजे अनेकदा भाषांतरकार 'जे की', 'ज्याला', 'ज्याने' या शब्दांचा उपयोग भाषांतर करताना इतका सर्रास करतात आणि तशी वाक्ये इतकी सर्रास खपवून घेतली जातात की त्यात आपण काही चुकतोय याचंही बहुतेकांना भान नसतं. म्हणजे, Sridevi, who had dominated the silver screen in the 80s, was a versatile actress. या वाक्याचं भाषांतर श्रीदेवी, ज्यांनी ऐंशीच्या दशकात रुपेरी पडद्यावर वर्चस्व गाजवले त्या चतुरस्र अभिनेत्री होत्या, असे काहीतरी केले जाते. ऐंशीच्या दशकात रुपेरी पडद्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या श्रीदेवी या चतुरस्र अभिनेत्री होत्या. हे त्याचे योग्य भाषांतर होईल. भावना पोहोचल्या ना, मग वाक्यरचनेत का शिरता, असा अनेकांचा सूर असतो. इंग्लिशमध्ये सुद्धा आय गोइंग, यू कमिंग म्हटले तरी अर्थ कळतो, पण लिहिताना किंवा व्यावसायिक पातळीवर वापरताना प्रमाण भाषाच वापरली जाते.

जाहिरातींमध्ये तर शब्दांचा वापरच चुकतो. कीटाणू हा शब्द हिंदीमधून थेट उचलला आहे. त्याला जीवाणू, विषाणू असे काही मराठी शब्द आहेत, हे अनेकांच्या गावीही नसते. क्लाएंट पण कीटाणूला प्राधान्य देतो, कारण त्याच्या मते हा शब्द सर्वांना कळतो. अनेकदा हिंदीचे आंधळेपणाने भाषांतर केले जाते किंवा मग इंग्लिश वाक्यरचनेप्रमाणे मराठीची वाक्यरचना केली जाते. पण ती 'आपली' भाषा नव्हे.

येत्या काळात स्थानिक भाषांतरकारांची गरज प्रचंड भासणार आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या स्थानिकीकरणावर भर देत आहेत, यावरून या भाषेतून करण्यात येणाऱ्या लिखित संवादाच्या व्याप्तीची कल्पना येऊ शकेल. मराठी भाषेचा आब राखण्याची जबाबदारी भाषांतरकारांची आहेच, त्याचबरोबर मराठीची 'सुपारी' दिल्यासारखा भाषेचा असा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असेल, तिथे वाचक-प्रेक्षकांनीही तक्रार करण्याची गरज आहे. ट्विटर, फेसबुक, कंपनीचा ई-मेल हे सर्व मार्ग उपलब्ध आहेत. मराठीचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला येण्याची वाट पाहू नका.


सुनील डिंगणकर सध्या मुक्त पत्रकार असून ते भाषांतर, जाहिरात मसुदालेखनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत

(sunil.translator@gmail.com)
 

Web Title: Job opportunities in Translation field for Marathi youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.