Join us  

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 3:31 PM

Jitendra avhad News : जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर काही जणांनी पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी या कृत्याचा विरोध दर्शविला आहे

मुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर काही जणांनी पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी या कृत्याचा विरोध दर्शविला आहे. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं समर्थन केले. परंतु मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी घडलेल्या या सर्व प्रकरणाचा विरोध केला आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी या मारहाणीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई व्हायला हवी असं मत व्यक्त केलं आहे.

कीर्तिकुमार शिंदे ट्विट करत म्हणाले की, सोशल मीडियावरचं मत पटलं नाही म्हणून ठाण्यातील अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करणं गरजेचं आहे. संचारबंदीच्या काळात हे कृत्य केल्यामुळे मग्रूर आव्हाडाच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला आहे. जितेंद्र आव्हाडांवर त्वरित कारवाई व्हायला हवी अशी मागणी कीर्तिकुमार शिंदे यांनी केली आहे. 

मनसेत मतभिन्नता

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करुन जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं समर्थन केलं आहे. मंत्री, कलाकार किंवा कोणत्याही एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी केलेल्या पोस्टवर विकृत पणे कमेंट करु नये. तसेच विकृतीची कमेंट केलीच तर विकृतीप्रमाणे मार खावा असं रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारहाण केली असेल तर हे चांगलेच केले. विकृतपणे कमेंट करणाऱ्यांना ठेचलेच पाहिजे असं रुपाली पाटील यांनी फेसबुकद्वारे सांगितले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवरुन मनसेतच मनभिन्नता असल्याचे दिसून येत आहे.

तत्पूर्वी जितेंद्र आव्हाड या सर्व प्रकरणावर म्हणाले की,  माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला असल्याचे प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमनसेराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारपोलिसभाजपादेवेंद्र फडणवीसराज ठाकरे