नियम पाळा, नाहीतर काम थांबवा! पालिकेची तीन हजारांहून अधिक बांधकामांना नोटीस
By सीमा महांगडे | Updated: October 30, 2025 12:57 IST2025-10-30T12:57:20+5:302025-10-30T12:57:40+5:30
हवा प्रदूषणात भर, काम थांबवण्याची नोटीस

नियम पाळा, नाहीतर काम थांबवा! पालिकेची तीन हजारांहून अधिक बांधकामांना नोटीस
सीमा महांगडे
मुंबई : हिवाळा आला की मुंबईत हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. विकासकामे, प्रकल्पांच्या ठिकाणी सर्वाधिक प्रदूषण होत असल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने २८ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन न केल्याने पालिकेने जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांत हजार ३९० आठ विकासकामांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यापैकी तीन हजार ४५८ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस दिली आहे.
मुंबईत विविध प्राधिकरणे, पालिका, विकासक यांच्या अखत्यारीतील आठ हजारांहून अधिक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ, धूर यामुळे हवेतील प्रदूषण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी, क्रेडाई, एमसीएचआय, नरेडको यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत.
बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी वॉर्डस्तरावर पथके नेमली आहेत.
या सूचनांचे पालन आवश्यक
७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्र्याचे आच्छादन असावे.
एक एकर किंवा २ त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे किंवा कापडांचे आच्छादन असावे.
बांधकाम हिरवे कापड झाकून बंदिस्त करावे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असावी.
बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नोटिशीनंतर विकासकांना जाग
विकासकांना पालिकेने कारणे दाखवा आणि काम थांबवण्याच्या नोटीस जारी केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे अनेकांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून पालिकेकडे नोटीस मागे घेण्यासाठी विनंत्या केल्या. आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्यानंतर दोन हजार ६९२ विकासकांना दिलेली नोटीस मागे घेण्यात आली आहे