आगामी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार; मुख्यमंत्र्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 20:55 IST2023-03-08T20:54:02+5:302023-03-08T20:55:02+5:30
मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या आवारात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि ...

आगामी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार; मुख्यमंत्र्याची माहिती
मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या आवारात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खास भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
आजची स्त्री ही सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून ती कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक आव्हानांचा सामना करत कर्तव्य बजावावे लागते याची जाण असल्याने महिला पोलिसांना आपले कर्तव्य बजावताना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज विधिमंडळाच्या आवारात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खास भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हेदेखील उपस्थित होते.#जागतिक_महिला_दिन#WorldWomensDaypic.twitter.com/h4fqN66jH8
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 8, 2023
आगामी अर्थसंकल्पात देखील राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असून महिला पोलिसांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानकांत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे सह-पोलीस आयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि खासदार रणजित निंबाळकर, आमदार राम सातपुते तसेच शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच विधानभवनाच्या आवारात सेवा बजावणाऱ्या सर्व महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.