रेल्वेरुळांलगत गटाराच्या पाण्यावर पिकतात भाज्या; प्रशासन काही बाेलणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 12:05 PM2024-02-06T12:05:38+5:302024-02-06T12:06:02+5:30

कारवाईबाबत रेल्वे प्रशासन ढिम्म, सांडपाण्यावर डोलताहेत मळे, मुंबईकरांच्या जीवाशी सुरू आहे खेळ

in mumbai Vegetables grow on sewage water along railway tracks; Will the administration do anything or not? | रेल्वेरुळांलगत गटाराच्या पाण्यावर पिकतात भाज्या; प्रशासन काही बाेलणार की नाही?

रेल्वेरुळांलगत गटाराच्या पाण्यावर पिकतात भाज्या; प्रशासन काही बाेलणार की नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रोज सकाळी ऑफिस वेळेत गाठण्यासाठी मुंबईकर लोकलच्या गर्दीत स्वत:ला झोकून देतात. एकापाठोपाठ स्टेशन मागे टाकत लोकल पुढे सरकते. या प्रवासात रेल्वेरुळालगत हिरवाईने नटलेले भाज्यांचे छोटेछोटे मळे दिसतात. त्यात असतो पालक, लाल माठ, मेथी आणि तत्सम भाजीपाला. काँक्रीटच्या जंगलात ही हिरवळ डोळ्यांना सुखावणारी असली तरी याच भाज्या मुंबईकरांच्या ताटात पडतात तेव्हा त्या आरोग्याला घातक ठरतात, असा आक्षेप  अनेक वर्षे घेतला जात आहे. मात्र यावर काेणालाही गंभीरपणे संशाेधन करावे असे वाटत नाही, असे संशाेधन चालू असेल तर त्याचे निष्कर्ष रेल्वे प्रशासनाला सांगावे वाटत नाही. रेल्वेरुळांच्या बाजूला तरारलेले विषारी सांडपाण्यावर पोसलेले हे भाज्यांचे मळे राेज मुंबईकरांच्या ताटात भाजी बनून जात आहेत. 

दादर ते परळ दरम्यान, मानखुर्द, कुर्ला, मुलुंड तसेच कळवा येथे मोठ्या प्रमाणात गटारीच्या पाण्याचा वापर भाजीपाला पिकविण्यासाठी केला जातो. मुंबई विभागात १२५ हून अधिक ठिकाणी हा असा भाजीपाला पिकवला जातो. येथून ठिकठिकाणी या भाजीपाल्याची विक्री केली जाते.

कल्याणजवळही घाण पाण्यावर पिकतो भाजीपाला

 रेल्वेरुळांलगत विषारी सांडपाण्याच्या जोरावर भाजीपाला पिकविण्याचे प्रकार ठाकुर्ली, कल्याण येथेही सर्रास चालत आहेत. मुळा, पालक, मेथी, कांदेपात अशा भाज्यांचा त्यात समावेश असतो. वांगीही पिकवली जातात, पण ती हाॅटेलात पाठविली जातात. 
 ठाकुर्ली, कल्याणला जाताना पत्रिपुलनजीक, कळव्याला जाताना बोगदा सोडला की त्या बाहेरील जागेत भाजी पिकवली जाते. पावसाच्या दिवसात पावसाचे पाणी मिळते, मात्र मिळेल त्या पाण्याने ही भाजी पिकवली जाते. खाडीच्या पाण्याचा वापर केला जातो. काही वर्षांपूर्वी या अशा भाज्या पिकवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. 
 रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्टीतील रासायनिक कारखान्यांनी सोडलेले सांडपाणी, अन्य उत्पादनांकरिता वापरून मोकळ्या जागेत सोडलेले पाणी याचा वापर करुन भाज्या पिकविल्या जातात. 
 अशी पालेभाजी लवकर पिकते, आणि ती लगेच काढून तिची जुडी बनवून नजीकच्या पाण्यात बुडवून स्वच्छ करायची आणि ती बोचकी बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते.

गेल्या २५ वर्षांपासून रेल्वे रुळालगत भाजीपाला पिकविला जातो. त्याबाबत न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. परंतु  जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी भाजीपाला लावला जातो, असे रेल्वेकडून सांगण्यात येते. पण भाजीपाल्यासाठी केमिकल फॅक्टरीतून सोडण्यात आलेले विषारी पाणी वापरले जाते. तपासणीत  हा भाजीपाला घातक असून त्याने कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात, असे समोर आले आहे. तरीदेखील रेल्वे कारवाईबाबत ढिम्म असून मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. 
- मधु कोटियन, 
अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ

विषारी गोष्टी पोटात जाण्याची शक्यता 
रेल्वे रुळांच्या दुतर्फा असणाऱ्या भागात ज्या भाज्या पिकविल्या जातात. त्याला बऱ्याचदा रसायनमिश्रित पाणी दिले जाते. त्या भाज्या खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो किंवा नाही याबाबत अद्याप वैद्यकीय शास्त्रात काही नमूद केलेले नाही. मात्र त्या पाण्यावरील भाज्यांमुळे लेड किंवा अन्य विषारी गोष्टी पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- डॉ. सचिन आलमेल, 
कर्करोग तज्ज्ञ, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल

पचन संस्था, मूत्रपिंडावर 
परिणाम होऊ शकतो 
रेल्वे रुळालगतच्या जमिनीवर भाजीपाला पिकवण्यासाठी घरगुती आणि उद्योगधंद्यांमधील सांडपाण्याचा वापर केला जातो. सांडपाणी खूपच प्रदूषित असेल तर अशा सांडपाण्यावर भाजी उगवत नाही. मात्र अनेक वेळा जेव्हा सांडपाण्याचा फ्लो कमी किंवा ज्या सांडपाण्यात प्रदूषण कमी निदर्शनास येईल, असे सांडपाणी भाजी पिकवण्यासाठी वापरले जाते. ती भाजी आपल्या जेवणात आली तर आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. रक्तावर परिणाम होऊ शकतो. मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.
- अविनाश कुबल, पर्यावरण तज्ज्ञ

वर्षभरात एकही कारवाई नाही
रेल्वेमार्गालगतचे भाज्यांचे मळे आणि त्यांची विषाक्तता या विषयावर माध्यमांनी सातत्याने आवाज उठवला, प्रवाशांनी आंदोलने केली तरी थातूरमातूर कारवाईपलीकडे मध्य रेल्वे प्रशासनाने कारवाई केली नाही. गेल्या वर्षभरात तर यासंदर्भात एकही कारवाई झाल्याची नोंद नाही. त्यामुळेच विषारी पाण्यावर पोसले गेलेले हे भाज्यांचे मळे सुखेनैव डोलत आहेत. 

का केली जाते लागवड?
मुंबई व उपनगरांत रेल्वे मार्गालगतची जागा रेल्वेच्या मालकीची आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना माफक शुल्क आकारून ही जमीन भाडेपट्टीने देण्यात येते. भाज्या पिकविण्यासाठी चांगल्या पाण्याचा वापर करावा, ही अट असते. परंतु ती पाळली जात नाही. रेल्वे प्रशासन त्याकडे सोईस्करपणे डोळेझाक करते. 

हिरवा एलईडी लावला जाताे
कल्याण-डाेंबिवली परिसरात कमी दर्जाची भाजी साधारणपणे रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या बाहेर स्कायवाक, पादचारी पूल, स्टेशनचा परिसर आदी भागात विकली जाते. चांगल्या पाण्यात पिकविलेल्या भाजीच्या तुलनेत ही स्वस्त भाजी नागरिकांना वाटेवर सहज मिळते. अनेकदा हिरवा रंग यावा यासाठी हिरवा एलईडी लावून त्याचा उजेड भाजीवर पडला की ती फ्रेश वाटते. त्यामुळे भाजी घेतली जाते.

Read in English

Web Title: in mumbai Vegetables grow on sewage water along railway tracks; Will the administration do anything or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.