बोरिवलीत राडा! उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवेळी महायुती अन् ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 22:13 IST2026-01-04T22:12:30+5:302026-01-04T22:13:19+5:30
उद्धव ठाकरेंसमोरच भाजपा कार्यकर्ते घोषणा देत असताना ठाकरे बंधूंचे कार्यकर्तेही आक्रमक झाले

बोरिवलीत राडा! उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवेळी महायुती अन् ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते आमनेसामने
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रचारावेळी ठाकरे बंधूंचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आज बोरिवली आणि कांदिवली भागात शाखा भेटी देत आहेत. उद्धव ठाकरेंनी बोरिवली पूर्व भागात शिवसेना शाखेला भेट दिली. तिथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र ते निघत असताना त्याच ठिकाणी भाजपा महायुतीच्या उमेदवाराची प्रचार रॅली आली. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली.
उद्धव ठाकरेंसमोरच भाजपा कार्यकर्ते घोषणा देत असताना ठाकरे बंधूंचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. उद्धव ठाकरे मागाठाणे मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार कविता माने यांच्या कार्यालयाठिकाणी आले होते. त्याच ठिकाणावरून शिंदेसेनेच्या उमेदवाराची रॅली चालली होती. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. बोरिवलीतील प्रभाग क्रमांक ११ च्या उद्धवसेना-मनसे उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या वार्डात महायुतीकडून आदिती खुरसुंगे यांना महायुतीने तिकिट दिले आहे. हा वार्ड शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघातील आहे.
याबाबत मनसे नेते नयन कदम म्हणाले की, महायुतीच्या उमेदवार बाजूला उभ्या होत्या. या लोकांची लायकी नाही. उद्धव ठाकरेंसमोर येण्याची या गद्दारांची लायकी नाही. उद्धव ठाकरे यांचा ताफा टर्न मारण्यासाठी गेला होता. उद्धव ठाकरे आतमध्ये कार्यालयात होते. या गद्दारांना इथं आम्ही आडवे करून टाकू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, आजच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला आहे. त्यात मुंबईला कंत्राटदारांच्या हातातून सोडवून ती पुन्हा मुंबईकरांच्या हाती देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असा निर्धार यावेळी त्यांनी केला. 'बेस्ट'च्या घरगुती ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. तसेच ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (Property Tax) पूर्णपणे माफ केला जाईल. घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १,५०० रुपये मदत दिली जाईल. तसेच महिलांसाठी दर २ किमीवर सुसज्ज स्वच्छतागृहे आणि 'मासाहेब किचन'मधून १० रुपयांत जेवण मिळेल यासह विविध घोषणा शिवशक्ती युती म्हणून त्यांनी मुंबईकरांसाठी केल्या.