कमिटमेंट सभागृह केले तर प्रश्न सुटतील!

By अतुल कुलकर्णी | Updated: May 3, 2026 07:21 IST2026-05-03T07:20:01+5:302026-05-03T07:21:20+5:30

विधान परिषदेच्या दहा जागा बिनविरोध निवडून आणल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन. पण, अनेकजण आपल्याला कमिटमेंट दिली आणि दुसऱ्याचाच नंबर लागला म्हणून दुःख व्यक्त करीत आहेत.

If the commitment is made in the hall, the problems will be solved | कमिटमेंट सभागृह केले तर प्रश्न सुटतील!

कमिटमेंट सभागृह केले तर प्रश्न सुटतील!

अतुल कुलकर्णी

संपादक, मुंबई

सर्वपक्षीय नेते हो

नमस्कार.

विधान परिषदेच्या दहा जागा बिनविरोध निवडून आणल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन. पण, अनेकजण आपल्याला कमिटमेंट दिली आणि दुसऱ्याचाच नंबर लागला म्हणून दुःख व्यक्त करीत आहेत. (याशिवाय ते वेगळे काही करू शकत नाहीत हा भाग वेगळा...) प्रत्येक पक्षाचा आमदार होऊ घातलेला नेता आमदारकी न मिळाल्यामुळे त्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवत आहे. आपण त्या समजून घ्याव्या आणि आम्ही सुचविलेला उपाय अंमलात आणता आला तर आणा. (आमचा उपाय अंमलात नाही आणला तर आम्ही काहीही करू शकत नाही हा ही भाग वेगळा...)

आम्ही किती दिवस पक्षासाठी सतरंज्या टाकायच्या.. (तरी बरे हल्ली खुर्च्या टाकाव्या लागतात, पण ती बोलण्याची पद्धत झाली. असो.) आमचे आयुष्य दुसऱ्यांच्या दिवाळीला आकाश दिवे करण्यातच जात आहे. आमच्या दिवाळीचा कोणी साधी पणती पण लावत नाही. अशी खंत काहींनी बोलून दाखविली आहे. आम्ही कसलीही अपेक्षा न ठेवता सोबत गेलो ही काय आमची चूक झाली का ? असा सवाल काहींच्या मनात आहे. अमूक पक्षात आल्यानंतर झोप चांगली लागते... पद नाही मिळाले तर काय बिघडले; असा समाधानाचा उद्विग्न सूर काहींनी आमच्या पुढे लावला. जीव तोडून काम करताना काही मिळावे अशी अपेक्षा ठेवली तर काय बिघडले...? आम्हाला कमिटमेंट केली त्याचे काय..? असे सवाल काहींनी केलेत.

एका घटनेत, आमच्या एका नेत्याने, दुसऱ्या पक्षात हस्तक्षेप करून, स्वपक्षातल्या एका नेत्याला शह देण्यासाठी, त्यांच्या पक्षातल्या उमेदवाराला आमदारकी दिल्याचे दुःख बोलून दाखविले... (समजले नाही तर हे वाक्य पुन्हा एकदा शांतपणे वाचा...)

दुसऱ्या घटनेत, आमच्या पक्षातले सगळे नेते, आमच्याच पक्षातल्या, आमच्याच एका नेत्याला उमेदवारी देऊ नका असे जीव तोडून सांगत होते. तरीही दुसऱ्या पक्षातल्या एका नेत्याने, आमच्याच पक्षातून, आम्हाला नकोशा झालेल्या त्या नेत्याला, पुन्हा उमेदवारी मिळवून दिली... (हेही वाक्य समजले नाही तर शांतपणे पुन्हा एकदा वाचा)

आता प्रश्न असा आहे की, आम्हाला आता काही काम करून घ्यायचे असेल, तर आमच्या पक्षातल्या नेत्याकडे जायचे ? की दुसऱ्या पक्षातल्या नेत्याने, आमच्या पक्षाच्या नेत्याला सांगा अशी विनवणी करायची..? असा प्रश्नही एकाने विचारला आहे.

मला आमदारकीला मदत कर, तुला नगरसेवक करतो... माझ्या लोकसभेचे काम कर, तुझी आमदारकी पक्की... जिल्हा परिषद जिंकून दे, तुलाच अध्यक्ष करतो... अशा पद्धतीच्या कमिटमेंट आपण अनेकांना केल्याचे त्यांचे म्हणणे आहे... (आमचे नाही...) या पूर्ण करायच्या असतील तर आमच्याकडे एक उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला एक छोटासा बदल करावा लागेल. आता एक सर्वपक्षीय ‘कमिटमेंट मेंबर्स’ असे नवे पद निर्माण करा. आपल्या राज्यात विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह आहेतच. त्यासाठी वेगळे बांधकाम किंवा वेगळी व्यवस्था निर्माण करण्याची गरज नाही. हिवाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले की दोन्ही सभागृहे तशी रिकामीच असतात. त्या काळात हे “कमिटमेंट मेंबर्स” त्याचा वापर करतील. त्यांना त्यांचा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडू द्या. त्यांना त्यांचा विरोधी पक्ष नेताही ठरवू द्या... असे “कमिटमेंट मेंबर्स” जिथे बसून कामकाज करतील त्या सभागृहाचे नाव “कमिटमेंट सभागृह” करून टाका. नगरसेवक, आमदार, खासदार झाल्यानंतर कसे बोलायचे असते हे त्यांना या निमित्ताने शिकायला मिळेल. जसे शाडो कॅबिनेट असते तसे... सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामुळे तुमच्या वरची नाराजी दूर होईल. तुम्ही तुमचे काम करायला मोकळे आणि हे सगळे कमिटमेंट मेंबर्स त्यांचे उद्योग करायला मोकळे..! हे कराल तर सर्वत्र शांतता निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला महागाई, वाढलेल्या गॅसच्या किमती, भाजीपाल्याचे वाढलेले दर, पाणीटंचाई, आरोग्याच्या समस्या, बेरोजगारी अशा फुटकळ गोष्टीसाठी तुम्हाला वेळ मिळेल. तुम्हालादेखील जनतेसाठी काही केल्याचे समाधान मिळेल... शेवटी समाधान महत्त्वाचे हे लक्षात ठेवा... ते जर मिळाले नाही तर तुमच्यासाठीदेखील एखादे “समाधान हाऊस” निर्माण करण्याच्या कल्पना आमच्याकडे आहेत. हव्या असतील तर कळवितो...  - तुमचाच, बाबूराव

Web Title : समस्याएँ सुलझाएँ: अधूरी प्रतिबद्धताओं के लिए 'प्रतिबद्धता कक्ष' बनाएँ!

Web Summary : निराश नेता अधूरे वादों को व्यक्त करते हैं. लेखक पद से वंचित लोगों के लिए 'प्रतिबद्धता कक्ष' बनाने का सुझाव देते हैं. इससे नेताओं को महंगाई और बेरोजगारी जैसे वास्तविक मुद्दों पर ध्यान केंद्रित करने की स्वतंत्रता मिलेगी, और अंततः संतुष्टि मिलेगी.

Web Title : Solve issues: Create a 'Commitment Chamber' for unfulfilled promises!

Web Summary : Frustrated leaders voice unmet promises. The author suggests creating a 'Commitment Chamber' for those denied positions. This would free up leaders to focus on real issues like inflation and unemployment, ultimately bringing satisfaction.