अजिबात घाबरून जाऊ नका; फक्त ‘ही’ १० बेसिक पथ्ये पाळा, HMPV चार हात लांब राहील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 07:37 IST2025-01-08T07:34:55+5:302025-01-08T07:37:02+5:30

HMPV Virus In India Update: नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी ‘ही’ काळजी घ्यावी. नेमके काय करावे? वाचा...

hmpv virus in maharashtra india updates do not panic at all just follow these 10 basic regimens and hmpv will stay away | अजिबात घाबरून जाऊ नका; फक्त ‘ही’ १० बेसिक पथ्ये पाळा, HMPV चार हात लांब राहील!

अजिबात घाबरून जाऊ नका; फक्त ‘ही’ १० बेसिक पथ्ये पाळा, HMPV चार हात लांब राहील!

HMPV Virus In India Update: एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण मुंबई व नागपूर येथे सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या, मते हा व्हायरस आपल्यासाठी नवीन नाही. यापूर्वीच आपल्याकडे आढळलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आरोग्य विभागांना या विषाणूबाबत सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे होणाऱ्या आजारात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. त्यावर उपचार उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय श्वसनाचे संसर्ग वाढू नये, यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. एचएमपीव्ही  हा साधारणतः सौम्य आजार आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतात. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना आजाराचा जास्त धोका असू शकतो. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो. सद्यस्थितीत भारतामध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवाढीमध्ये वाढ आढळून आलेली नसून या स्थितीला काळजीचे कारण नाही. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधीसाठा आहे. या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे करण्यात येत आहे.

नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी ‘ही’ काळजी घ्यावी

- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा

- आपले हात वारंवार धुवा.

- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

- भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.

- संक्रमण कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा व कार्यालये इ. ठिकाणी हवा खेळती असावी.

- आजारी लोकांशी जवळचा संपर्क नसावा.

- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे.

- सर्दी व खोकला झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
 

Web Title: hmpv virus in maharashtra india updates do not panic at all just follow these 10 basic regimens and hmpv will stay away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.