बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 05:40 IST2025-06-23T05:40:03+5:302025-06-23T05:40:48+5:30

पोलिसांसह सर्वच जण रूग्णवाहिका आणि शववाहिनी चालकांना फोन करतात. ते उडवाउडवीची उत्तरे देऊन येणे टाळतात.

He died in front of onlookers, his body was on the road for 2 hours; Police request was also rejected | बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली

बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली

मीरा रोड : एक व्यक्ती फिट येऊन भर रस्त्यात कोसळते. त्याला पाहायला तिथे गर्दी होते. पण मदतीसाठी कोणीच पुढे येत नाही. तेथेच त्याचा मृत्यू होतो. पोलिस घटनास्थळी येतात. पोलिसांसह सर्वच जण रूग्णवाहिका आणि शववाहिनी चालकांना फोन करतात. ते उडवाउडवीची उत्तरे देऊन येणे टाळतात. दोन तास रस्त्यातच मृतदेह तसाच पडून राहतो. अखेर पत्नी पतीचा मृतदेह रिक्षात ठेवते आणि रूग्णालयात नेते. 

भाईंदरमध्ये शनिवारी घडलेला हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा होता. भाईंदर पश्चिमेच्या जय अंबे नगर भागात राहणारे बंसराज रामबली मौर्य (वय ४५) यांना  भाईंदर पूर्वेकडे रेल्वे स्थानकासमोरील शॉपिंग सेंटरजवळ शनिवारी फिट आली. 

बघे जमले पण त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्यांच्या पत्नीला माहिती मिळताच त्या तेथे आल्या. मात्र तोपर्यंत मौर्य यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीने तेथेच हंबरडा फोडला. त्यानंतर दोन पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. रात्री ९:२० पर्यंत मौर्य यांचा मृतदेह तेथेच पडून होता.  

पोलिस पत्र देत नाहीत...

लोकमतच्या प्रतिनिधीने भाईंदर पूर्व तलाव मार्गावरील पालिकेच्या शववाहिनीचालकास कॉल केला. तेव्हा त्यांनी ‘आधी पत्र पाठवा, मग येतो,’ असे सांगितले. 

पोलिस घटनास्थळी आहेत, पत्र देतील असे सांगितले असता चालकाने ‘नंतर पोलिस पत्र देत नाहीत’ असे कारण सांगून येण्यास नकार दिला.

सांगूनही आलाच नाही!

नवघर पोलिसांनी त्या चालकास संपर्क करून शववाहिनी घेऊन येण्यास सांगितले. २० मिनिटांनंतर त्या चालकाने थोड्या वेळाने येतो असे सांगितले. मात्र, तो आलाच नाही.

Web Title: He died in front of onlookers, his body was on the road for 2 hours; Police request was also rejected