धनंजय मुंडेंचा नक्की राजीनामा घेतलाय की नाही?; पाटील-पटोलेंकडून सभागृहात सरकारची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:41 IST2025-03-07T17:40:41+5:302025-03-07T17:41:05+5:30

विधानसभा अध्यक्षांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेत सरकारला लक्ष्य केलं.

Has Dhananjay Munde really resigned nana patole and jayant patil criticized government | धनंजय मुंडेंचा नक्की राजीनामा घेतलाय की नाही?; पाटील-पटोलेंकडून सभागृहात सरकारची कोंडी

धनंजय मुंडेंचा नक्की राजीनामा घेतलाय की नाही?; पाटील-पटोलेंकडून सभागृहात सरकारची कोंडी

NCP Dhananjay Munde: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं. मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून या राजीनाम्याची माहिती अधिवेशन सुरू असूनही सभागृहात न देण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

"धनंजय मुंडेंचा राजीनामा मंजूर केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. परंतु सभागृहाला याची माहिती देण्यात आली नाही. खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे का? आणि राजीनामा घेतला असेल तर त्याची माहिती सभागृहाला का देण्यात आली नाही?" असा प्रश्न काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेत सरकारला लक्ष्य केलं.

"मंत्र्‍यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात देण्याचा नियम वा प्रथा नाही, असं तुम्हाला तालिकेवर बसलेल्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात असेल तर ते चुकीचं आहे आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं आणि आम्ही तो मंजूर केल्याचं मुख्यमंत्री बाहेर पत्रकारांसमोर सांगतात. मुंडे यांनी राजीनामा दिला असेल तर त्याची माहिती या सभागृहात देणं आवश्यक असतं. अन्यथा तो सभागृहाचा अपमान ठरतो. चुकीच्या प्रथा आणि पायंडे या सभागृहात पाडले जात आहेत," असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान, नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्या टीकेनंतर आता विधानसभा अध्यक्षांकडून सभागृहात धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याविषयी अधिकृत माहिती दिली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Has Dhananjay Munde really resigned nana patole and jayant patil criticized government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.