भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना गुगलकडून आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 13:15 IST2018-04-30T13:12:34+5:302018-04-30T13:15:21+5:30
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिन.

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना गुगलकडून आदरांजली
मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिन. दादासाहेब फाळके यांची आज 148 वी जयंती. यानिमित्ताने गुगलने खास डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलनं त्यांच्या सिनेक्षेत्रातील कार्याला डूडलद्वारे सलाम केला आहे.
दादासाहेब यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून देशात खऱ्या अर्थानं सिनेमांची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘सत्यवान सावित्री’ आणि ‘कालिया मर्दन’ या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. दादासाहेबांनी आपल्या सिनेनिर्मितीच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत 95 सिनेमे आणि 26 लघुपटांची निर्मिती केली.
नाशिकमधील त्र्यंबक येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या कुटुंबात धुंडिराज गोविंद फाळके म्हणजे दादासाहेब फाळके यांचा जन्म झाला. 30 एप्रिल 1870 रोजी त्यांचा जन्म झाला. दादासाहेब फाळके यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपले शिक्षण पूर्ण केले. तसेच सुरुवातीला गुजरातमधील गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. मुंबईत 15 एप्रिल 1910 रोजी 'द लाईफ ऑफ ख्राइस्ट' हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी स्वदेशी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला आणि 3 मे 1913 रोजी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला मूकपट प्रदर्शित केला.