पाच लाखांचा ऐवज चोरीला; चोरास दोन महिन्यांनंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:31 AM2020-03-04T02:31:43+5:302020-03-04T02:31:47+5:30

प्रवाशाचे पाच लाख रुपये चोरी करून पसार झालेल्या आरोपीला बोरीवली रेल्वे पोलिसांनी अखेर अटक केली.

Five lakhs were stolen; Thieves arrested two months later | पाच लाखांचा ऐवज चोरीला; चोरास दोन महिन्यांनंतर अटक

पाच लाखांचा ऐवज चोरीला; चोरास दोन महिन्यांनंतर अटक

Next

मुंबई : प्रवाशाचे पाच लाख रुपये चोरी करून पसार झालेल्या आरोपीला बोरीवली रेल्वे पोलिसांनी अखेर अटक केली. मागील दोन
महिने पोलिसांच्या सापळ्यात न अडकणारा आरोपी मोहम्मद सिद्दीकी नुकताच जेरबंद झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख
रुपयांचा मौल्यवान ऐवज ताब्यात घेतला आहे. गोरेगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार जयरुबी नाडार पतीसह १२ जानेवारी
रोजी वसई येथे लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासासाठी त्यांनी नालासोपारा येथून चर्चगेट दिशेकडे जाणारी जलद लोकल
पकडली. मात्र ही लोकल गोरेगाव येथे थांबणार नसल्याचे समजले. त्यानंतर हे दोघे बोरीवली रेल्वेस्थानकावर उतरून लोकलची
वाट पाहू लागले. बोरीवली स्थानकावर अंधेरीला जाणारी धीमी लोकल आली. या लोकलमध्ये दोघे बसले. मात्र बॅग बोरीवली स्थानकावर
विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगेत मोबाइल, सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम असा ४ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज होता. त्यामुळे दोघे भयभीत झाले. ते लगेच कांदिवली येथे उतरून बोरीवली स्थानकावर पोहोचले. मात्र तेथे बॅग दिसून आली नाही. नाडार यांनी बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बॅगेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस सीसीटीव्ही फुटेज पाहून बॅगेचा शोध घेऊ लागले. सीसीटीव्ही फुटेजद्वारे ५० वर्षीय इसम बॅग घेऊन निघून जाताना दिसला. बॅग घेऊन जाणारा मोहम्मद सिद्दीकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वारंवार सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी सापळ्यात अडकला नाही. १ मार्च रोजी पोलिसांनी सापळा रचून आरोपी मोहम्मद सिद्दीकीला पकडले. पोलिसांनी सिद्दीकीची कसून
चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Five lakhs were stolen; Thieves arrested two months later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.