सुखी वृद्धापकाळासाठी आर्थिक तरतूद महत्त्वाची

By Admin | Updated: June 16, 2015 01:41 IST2015-06-16T01:41:56+5:302015-06-16T01:41:56+5:30

आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदात राहायचे असेल, कोणीही आपला अपमान करू नये, त्रास देऊ नये असे वाटत असल्यास आधीपासूनच आर्थिक नियोजन करावे,

Financial provision is important for a happy old age | सुखी वृद्धापकाळासाठी आर्थिक तरतूद महत्त्वाची

सुखी वृद्धापकाळासाठी आर्थिक तरतूद महत्त्वाची

मुंबई : आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदात राहायचे असेल, कोणीही आपला अपमान करू नये, त्रास देऊ नये असे वाटत असल्यास आधीपासूनच आर्थिक नियोजन करावे, असे मत देशातील ३१.५ टक्के तरूणाईने मांडले आहे. तर, वृद्धांनी समाजात मिळून मिसळून राहण्याची आणि सक्रिय राहण्याची आवश्यकता असल्याचे मत ६७.५ टक्के तरूणाईने नोंदवले आहे.
हेल्प एज इंडियाने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ विरोधी दिना’निमित्त देशभरात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात तरूणाईला ज्येष्ठ नागरिकांविषयी प्रश्न विचारून त्यांची मते जाणून घेतली. ७३ टक्के तरूणांनी ज्येष्ठांचा छळ होत असल्याचे मान्य केले. ज्येष्ठ नागरिकाचा कोणत्याही प्रकारचा छळ होत असल्यास छळ करणाऱ्यांच्या विरोधात थेट कारवाई झाली पाहिजे, असे मत ६० टक्के तरूणाईने व्यक्त केले. या मतावरून ज्येष्ठ नागरिकांविषयी तरूणाई जागरूक असल्याचे चित्र आहे. परंतु, वास्तव आणि या टक्केवारीत विषमता आहे. यामुळेच तरूणाई इतकी जागरूक असेल तर ज्येष्ठ नागरिकांचा छळ का होतो? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला असल्याचे हेल्प एजचे म्हणणे आहे.
वृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य असल्यास अनेक अनुचित बाबी सहजगत्या टाळता येऊ शकतात, असे तरूणांचे मत आहे. पण, दुसरीकडे पैसा, मालमत्ता या कारणांवरूनच अनेक ज्येष्ठ नागरिकांचा छळ होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे ५३.२ टक्के तरूणांना वाटते. तर वृद्ध व्यक्तींच्या वृत्तीमुळे आणि नातेसंबंधातील अंतरांमुळे त्यांचा छळ होतो, असे ३५.७ टक्के तरूणांचे मत आहे. नातेसंबध सुधारण्यावर भर दिल्यास असे छळाचे प्रकार रोखता येथील, अशी भावना अनेकांनी या सर्वेक्षणात व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Financial provision is important for a happy old age