Join us

Video: अखेर खासदार अमोल कोल्हे, अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणावर बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 17:03 IST

अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत

मुंबई - सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे नामक एका तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये या तरुणाने दावा केला आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आली. खुद्द भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यानंतर, आता शिरुर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. नाण्याची दुसरी बाजू तपासणेही गरजेचं असल्याचं कोल्हे यांनी म्हटलंय.  

अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असं वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, त्याच्यापुढे जाणाऱ्या माणसांना मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. याप्रकरणी खासदार अमोल कोल्हे यांनी आपलं मत मांडताना, सत्यशील शेरकर हे माझे चांगले मित्र असल्याचं म्हटलंय. 

अक्षय बोऱ्हाडेंच्या अनुषंगाने मला अनेकांचे फोन आले. अक्षयच्या कामाचं मलाही कौतुकच आहे, पण अक्षयने आरोप केलेले सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्याअगोदरपासूनच चांगले मित्र आहोत. सत्यशील शेरकरांनादेखील मी जवळून ओळखतो. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केली आहे, असे कोल्हे यांनी म्हटले. 

तसेच, अक्षय बोराडे यांनी समाजमाध्यमावर प्रसारीत केलेला व्हिडिओ ही नाण्याची एक बाजू असू शकते, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. स्थानिक पातळीवरील, गावपातळीवरील अनेक पदर दुसऱ्या बाजुला असू शकतात. सोशल मीडियावरील अशा व्हिडिओवरुन आपण आपली मतं बनवायला लागलो, तर यापुढे समाजकारणातील-राजकारणातील एखाद्याची कारकिर्द, त्या कारकिर्दीला बट्टा लावण्याचा, डाग लावण्याचा धोका पुढील काळात नाकारता येणार नाही. त्यामुळे, सोशल मीडियावरील एका बाजूवरुन आपल मत बनवण्यापेक्षा, सत्यजीत शेरकर यांची सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा पोलीस यंत्रणेला याचा तपास करु द्या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. तसेच, याप्रकरणी कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असे आश्वासनही कोल्हे यांनी दिले आहे. 

 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेशिरुरपुणेगुन्हेगारीपोलिस