अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 06:14 IST2025-03-05T06:13:37+5:302025-03-05T06:14:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. सोमवारी रात्री नेत्यांची दीड तास खलबते झाल्यानंतर राजीनामा देण्याचे फर्मान, मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा पत्र पीएच्या हातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले.

अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोमवारी संध्याकाळी समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू झाली. सरकारवर दबाव वाढला आणि अखेर तीन महिन्यांनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल होऊ लागले आणि त्यावर राग अन् रोष व्यक्त होऊ लागला. ही बाब अजित पवार यांच्या पक्षासाठी आणि सरकारसाठीही अडचणीची ठरत आहे, हे लक्षात आल्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी रात्री नऊच्या दरम्यान बैठक पार पडली.
तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे लागेल, असा दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना भरला आणि मग मुंडे यांना राजीनामा देण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही, असा घटनाक्रम आता समोर येत आहे.
अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस हे प्रारंभीपासून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. गेल्या काही दिवसांत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चादेखील केली होती. मुंडे यांनाही फडणवीस यांनी समजावून सांगितले. पण, ते ऐकायला तयार नव्हते.
शेवटी राजीनामा देणार नसाल, तर बडतर्फीची कारवाई करावी लागेल, असे फडणवीस यांनी बजावले. सोमवारी रात्री उशिरा अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गेले, तेव्हाही मुंडेंना फडणवीस यांनी हेच सांगितले. मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचे नेते अजित पवार घेतील असे फडणवीस यांनी म्हटले होते. मुंडे यांचा पवारांनी राजीनामा घेतला पाहिजे असेच त्यातून त्यांनी स्पष्टपणे सूचित केले होते.
देवगिरीवरील बैठक आणि राजीनामा...
देवगिरी बंगल्यावर दीड तास चाललेल्या बैठकीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व धनंजय मुंडेही होते. राजीनामा द्या, असे त्यांना सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी मुंडेंनी राजीनामा पीए व ओएसडी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. तो मी स्वीकारला आहे व राज्यपालांकडे पाठवला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
राजीनामा कशामुळे?
नैतिकता : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला’, अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही नैतिकतेला धरूनच मुंडे यांनी राजीनमा दिल्याचे म्हटले.
आजारपण : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून, तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
नागपूर अधिवेशन ते मुंबई अधिवेशन
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आवाज उठवला. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी वाल्मीक कराडला बेड्या ठोकल्या. त्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. नागपूर अधिवेशनात मुंडेंच्या राजीनाम्याचा उपस्थित झालेला मुद्दा मुंबईतील अधिवेशनात निकाली निघाला.
धनंजय मुंडे यांच्या निर्णयाचे मी स्वागत करते; परंतु त्यांचा राजीनामा फार आधीच व्हायला पाहिजे हाेता, किंबहुना त्यांनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नकाे हाेती; पण ‘देर आये दुरुस्त आये’. देशमुखांच्या हत्येचा व्हिडीओ पाहण्याची माझी हिंमत नाही. मी देशमुखांच्या आईची क्षमा मागते. या घटनेमागे काेण आहेत, त्या प्रत्येकाला कठाेर शिक्षा व्हावी. - पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री