आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा; व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 11:44 AM2024-02-10T11:44:58+5:302024-02-10T11:45:45+5:30

आमदार रोहित पवार यांनी संतोष बांगर यांचा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

File a case against MLA Santosh Bangar; Rohit Pawar's demand by sharing the video | आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा; व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा संताप

आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा; व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा संताप

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असून लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांचाही बिगुल वाजणार आहे. त्यामुळे, आमदार, खासदारही लोकांमध्ये जाऊन जवळीस साधत आहेत. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, मला आमदार करण्यासाठी २ दिवस जेवण न करण्याचं म्हटलं. त्यावरुन, आता आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. 

आमदार रोहित पवार यांनी संतोष बांगर यांचा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान जागृती करण्यात येते. त्यासाठी, विविध उपक्रमांतून नवयुवकांना आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जातं. तसेच, मतदान प्रक्रियेत उमेदवारांनाही काही आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे. त्यानुसार, आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचंही आयोगाकडून बजावलं जातं. त्यामध्ये, शाळकरी मुलांचा वापर प्रचारासाठी केला जाऊ नये, असेही सांगण्यात येते. मात्र, आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ते शाळेतील मुलांचा वापर स्वत:च्या प्रचारासाठी करत असल्याचं दिसून येत आहे. 


आमदार संतोष बांगरे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतीमुळे सोशल मीडियात चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे म्हटले होते. तसे न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईल, असेही त्यांनी म्हटले. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता, शाळेतील मुलांसोबत निवडणूक आणि मतदानावर चर्चा करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.   

संतोष बांगर यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही, म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच, लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

Web Title: File a case against MLA Santosh Bangar; Rohit Pawar's demand by sharing the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.