अमूलचे बनावट बटर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, हॉटेलवाल्यांना पुरवठा करणारे दाेन अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:31 PM2024-03-07T14:31:31+5:302024-03-07T14:32:43+5:30

पोलिस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग यांना मंगळवारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खोणी गावातील तरंग हॉटेेलजवळील एका इमारतीत बनावट बटर बनवून विकले जात आहे.

Fake butter makers of Amul busted, two suppliers of hoteliers arrested | अमूलचे बनावट बटर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, हॉटेलवाल्यांना पुरवठा करणारे दाेन अटकेत

अमूलचे बनावट बटर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, हॉटेलवाल्यांना पुरवठा करणारे दाेन अटकेत

डोंबिवली : काटई-बदलापूर मार्गावरील खोणी गावाजवळ सुरू असलेल्या बनावट अमूल बटर बनवणाऱ्या कारखान्यावर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला. पोलिसांनी पिंटू झिनक यादव (३६) आणि प्रेमचंद फेकुराम (३२) यांना बेड्या ठोकून बनावट बटर बनविण्याकरिता लागणारे साहित्य, मशीन व कच्चा माल, अमूल कंपनीचे कागदी बॉक्स असा दोन लाख ९३ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग यांना मंगळवारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खोणी गावातील तरंग हॉटेेलजवळील एका इमारतीत बनावट बटर बनवून विकले जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल मस्के, सहायक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, दीपक महाजन, बालाजी शिंदे, विश्वास माने, अमोल बोेरकर, अनुप कामत, सचिन वानखडे आदींच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. 

सॅण्डविचमध्ये वापर 
- कारखान्याचा मालक पिंटू यादव बटर वनस्पती (कमानी करुणा) रिफाइंड पामोलिन ऑइल (कमानी फ्रायवेल), मीठ, अनॅटो फूड कलर यांचे मिश्रण टाकीमध्ये एकत्रित करून ते मशीनच्या मदतीने हलवून एकजीव करून मोल्डच्या ट्रेमध्ये आकार येण्यासाठी ठेवून नंतर त्यातून काढून ते घट्ट करण्यासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवत होता. 
- आरोग्याला हानीकारक असलेल्या या बनावट बटरला अमूल कंपनीच्या नावचे बटर पेपर लावून नंतर ते अमूल कंपनीच्या बटर विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदी बॉक्समध्ये ते पॅक करून किरकोळ हॉटेल्स, सॅण्डविच हातगाडी व ढाबे या व्यावसायिकांना ओरिजनल अमूल बटर म्हणून त्याचा पुरवठा केला जात होता. 

या कारवाईत ठाणे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजेंद्र करडक आणि अर्चना वानरे हेही सहभागी झाले होते. मंगळवारी दुपारी दोन वाजता छापा टाकण्यात आला. बुधवारी पहाटे पाचपर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Fake butter makers of Amul busted, two suppliers of hoteliers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.